Mon, May 25, 2020 11:19होमपेज › Goa › शहांनी राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्यावा : कामत

शहांनी राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्यावा : कामत

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

भारतातील कोणत्याही  राज्यात आजपर्यंत मुख्यमंत्री पद रिकामे राहिले अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. गोव्याला सध्या मुख्यमंत्र्यांची गरज असून गोवा दौर्‍यावर आलेले  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत यांनी केली.  

मिरामार येथील पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या आमदार व कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी राज्यासाठी मुख्यमंत्री नेमण्यात यावा, यासाठी शांततापूर्ण निदर्शने केली. यावेळी कामत बोलत होते. 

प्रदेश काँग्रेसचे नेते अ‍ॅड. रमाकांत खलप, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कुंकळीचे आमदार क्‍लाफासिओ डायस, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो व काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दिगंबर कामत म्हणाले, राज्यात मुख्यमंत्र्यांच्या  अनुपस्थितीमुळे  घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. राज्याच्या सुरळीत कारभारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अशावेळी राज्याला मुख्यमंत्री द्यावा. 

प्रदेश काँग्रेसचे नेते अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले, की मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मागील तीन महिन्यांपासून परदेशात वैद्यकीय उपचार घेत असल्याने  राज्यात अनुपस्थित आहेत. हा जनता, घटनेचा व काँग्रेसचा अपमान आहे. या संदर्भात राज्यपाल यांनाही निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यांनी काही कृती केली नसून न्यायालयाने याची स्वेच्छा दखल घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याबाबत विचार करण्यात येतील.

बाबू कवळेकर म्हणाले,की काँग्रेसचे दोन ते तीन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची अफवा पसरविली जात आहे. परंतु असे काही नसून आमचे सोळा आमदार एकसंध आहेत. राज्यातील लोकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. लोकांसाठी खाण संदर्भात काँग्रेसने सरकारला साथ देउन केंद्राकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांची तब्बेत बरी नसतानाही आम्ही समजून घेतले. परंतु, आता तीन महिने होत आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हंगामी मुख्यमंत्री म्हणून भाजपमध्ये एकही  लायक व्यक्‍ती नाही हे यावरून दिसून येते आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की गोव्यात मागील तीन महिन्यांत केवळ एकच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामुळे सरकार अस्तित्वात आहे का नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. जनतेमध्ये विविध मुद्यांवरुन असंतोष असून वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलने सुरू आहेत. 

अमित शहा यांनी गोव्याचा मुख्यमंत्री जाहीर करावा. जोपर्यंत राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री मिळत नाही, तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. जे आमदार बिकाऊ होते, ते यापूर्वीच पक्ष साडून गेले आहेत. आता काँग्रेस पक्षात बिकाऊ आमदार उरलेले नाहीत.

काँग्रेस सोडणार नाही : आमदार सोपटे
काँग्रेसमधून भाजपमध्ये  उडी घेण्याच्या विषयावर स्पष्टीकरण देताना आमदार दयानंद  सोपटे म्हणाले, ही निव्वळ अफवा असून सोपटेला विकत घेणे इतके सोपे नाही. आपण इतकाही स्वस्त नाही. आपण काँग्रेस कधीच सोडणार नाही. काँग्रेसचे सर्व 16 आमदार एकसंध आहेत. सध्या सरकार सुरळीत  चालत नसल्याने भाजपचे आमदारच नाखूष आहेत,  त्यांना दाखविण्यासाठी ही अफवा पसरविली जात आहे.भाजपमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी खंबीर नेता नसल्यास त्यांनी सरकार काँग्रेसकडे सोपवावे.