Wed, Jul 08, 2020 12:20



होमपेज › Goa › पक्ष बदलूंना रोखण्यास कठोर कायद्याची गरज 

पक्ष बदलूंना रोखण्यास कठोर कायद्याची गरज 

Published On: Jul 15 2019 1:59AM | Last Updated: Jul 15 2019 1:59AM




फोंडा : प्रतिनिधी

सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारण्याचे प्रकार आणि मतदारांचा केला जाणारा विश्‍वासघात रोखण्यासाठी कठोर पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता आहे. या पक्षातून त्या पक्षात माकडउड्या मारणार्‍यांना किमान सहा वर्षे तरी निवडणूक लढवण्यास बंदी आणायला हवी, असे मत माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्‍त केले. गोव्यात सध्या जे काही चालले आहे त्याचा खरे म्हणजे जनतेनेच गंभीरपणे विचार करणे आवश्यक असून आमदार म्हणवून घ्यायलाही लाज वाटावी, अशी स्थिती सध्या गोव्यात आहे, असे ढवळीकर म्हणाले. 

फोंड्यात पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले, देशातील एक छोटेसे राज्य गोवा असले तरी घाणेरड्या राजकारणामुळे या राज्याचे नाव बदनाम झाले आहे. गोव्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमदार प्रतापसिंह राणे आणि मगोचा आमदार म्हणून आपण अशी दोनच नावे गोमंतकीयांना आपापल्या पक्षाशी प्रामाणिक राहिल्याची घेता येणे शक्य आहे. केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणारे खूपजण आहेत, पण पक्षाशी प्रामाणिक राहणारे सध्या दोघेच असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाने साडेचार लाख सदस्य नोंदणीसाठी मोहीम उघडली आहे, मग इतर पक्षांचे आमदार भाजपमध्ये घेण्याची गरज काय होती, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल करून गोव्यातील या माकडउड्यांसंबंधीचा प्रश्‍न मगो पक्षच आता जनतेसमोर घेऊन जाणार असून मतदारांत जागृती करण्यासाठी सबंध राज्यभर 

मोहीम उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मगो पक्षाला बर्‍याचदा चढउतार सहन करावा लागला आहे. मात्र, जनतेच्या प्रेमामुळेच आणि विश्‍वासामुळेच मगो पक्ष भरारी घेऊ शकला आहे. मगोचे दोन आमदार फुटले असले तरी आपण मगो पक्षातच राहणार असून मगो भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

गेल्या गणेश चतुर्थीला मनोहर पर्रीकर यांनी आजारपणामुळे आपल्याकडे राज्याचा ताबा देण्याचे ठरवले होते. पण त्यावेळेला विजय सरदेसाई यांनी खो घातला. आपल्याकडे सहा आणि सात आमदार आहेत, असे म्हणणार्‍या आणि इतरांना वेठीस धरणार्‍या गोवा फॉरवर्डकडे कुठे आहेत ते सहा आणि सात आमदार असा सवाल करून सांतआंद्रे मतदारसंघात मगोच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा मात्र प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. विजय सरदेसाई यांनी मगो पक्षाने सरकारचा पाठिंबा काढला नसल्याने खिल्ली उडवली होती. मात्र जेव्हा तीन आमदारांपैकी दोन आमदार फुटून भाजपमध्ये जातात, तेव्हा पाठिंबा कुठे शिल्लक राहतो, असा सवाल करून विधायक कार्याला मगोचा नेहमी पाठिंबा असेल, मात्र अनिष्ट आणि अन्यायाविरूद्ध मगो पक्ष ठामपणे उभा राहील. सभापती म्हणून प्रमोद सावंत यांनी चांगले काम केले आहे, आता मुख्यमंत्री म्हणून एक वर्ष तरी द्यायला हवे, त्यानंतरच मुख्यमंत्री कार्यक्षम की विधायक गोष्टीला सहकार्य करतात, हे आपण ठरवू शकतो, त्यामुळेच विधायक गोष्टीला आपला नेहमीच पाठिंबा असून या विधानसभा अधिवेशनात मुख्यत्वे करून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ढवळीकर म्हणाले. 

जनतेनेच फुटिरांना येत्या निवडणुकीत योग्य जागा दाखवण्याची खरी गरज आहे. लोकशाहीवरील लोकांचा विश्‍वास उडत चालला असून मगो पक्ष अशावेळेला खंबीरपणे उभा राहणार असून लोकांच्या पाठिंब्याची आणि चांगल्या विचारांच्या माणसांची आज मगोला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.