Tue, May 26, 2020 06:14होमपेज › Goa › नानोड्यात एकाचा गळा चिरून खून

नानोड्यात एकाचा गळा चिरून खून

Last Updated: Oct 20 2019 1:25AM
डिचोली : प्रतिनिधी

नानोडा डिचोली येथील बसस्टॉपजवळील खोलीमध्ये दोन मजुरांमधील वादाचे पर्यावसन एकाच्या खुनात झाले. विजापुर, सिंदगी, कर्नाटक येथील शब्बीर इमामसाब बैकटी या मजुराचा त्याच खोलीत राहणार्‍या जालोर, बिजापुर- कर्नाटक येथील इरन्ना गौड याने सुरीच्या सहाय्याने गळा चिरून खून केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या प्रकरणी जलदगतीने तपास करून डिचोली पोलिसांनी संशयिताला चार तासांच्या आत म्हापसा बसस्थानकावर पळ काढण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.

उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित इरन्ना गौड याने तीन चार दिवसांपूर्वी शब्बीर बैकटी याला फोनवरून संपर्क साधून आपल्या खोलीवर बोलावून घेतले व काही काम असल्यास सांगतो असे सांगून आपल्याच खोलीवर ठेऊन घेतले. सांगितल्याप्रमाणे इरन्ना याला एका कामावर शब्बीर याने ठेवले असता इरन्ना याला सदर काम आवडले नाही. या गोष्टीवरून या दोघांमध्ये खोलीत जोरदार भांडण होऊन मारामारी झाली. 

त्यानंतर शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री या दोघांनीही भरपूर मद्यपान केले व मध्यरात्रीनंतर इरन्ना याने शब्बीर याच्यावर सुरीने वार करीत त्याचा जिव घेतला. गळ्यावर इरन्नाने वार केल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

यानंतर  इरन्ना  याने पळ काढण्याच्या इराद्याने नानोडा येथील खोली सोडली आणि थेट म्हापसा गाठले. येथून आपल्या गावात पळ काढण्याच्या तयारीत असताना डिचोली पोलिसांनी म्हापसा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. डिचोली पोलिस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत खरात यांच्यासह पोलिस कॉन्स्टेेबल गौरव वायंगणकर व सदानंद मळीक यांनी मोठ्या शिताफीने संशयित इरन्ना याला ताब्यात घेऊन डिचोली पोलीस स्थानकात आणले.

सदर प्रकरणी कानोळकरवाडा नानोडा येथील सचिन फळारी यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर खोलीत राहणार्‍या त्या मजुरांची भाडेकरू पडताळणी अर्ज भरलेले नसल्याचे आढळून आले असल्याने  या प्रकरणी खोलीच्या मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती डिचोली पोलीस निरिक्षक संजय दळवी यांनी दिली. 

खुनाचे कारण अस्पष्ट...

डिचोली पोलिस स्थानकात आरोपी इरन्ना गौड याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या खुनामागचे कारण त्याने अद्याप स्पष्ट केले नसले तरी डिचोली पोलिसांनी संशयित इरन्ना याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.