Wed, Jul 08, 2020 12:48होमपेज › Goa › हणजूण ग्रामस्थांचा स्पा विरोधात मोर्चा

हणजूण ग्रामस्थांचा स्पा विरोधात मोर्चा

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 29 2019 2:09AM
म्हापसा : प्रतिनिधी

हणजूण येथे स्पाच्या नावाखाली चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर पंचायत व पोलिस कारवाई करीत नसल्याचे पाहून देवस्थानच्या भाविकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेल्याने  स्पावाले   घाबरून पळत असताना तिघांना लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर पोलिसांनी दोघांना पकडले. दोन युवतींना अटक करून सुधारगृहात पाठवले. अटक केलेल्या पाचहीजणांवर वेश्या व्यवसाय प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डिमेलो हणजूण येथील सेल्वीन मिनेझीस यांच्या मालकीच्या घरात स्पाचा व्यवसाय चालू होता. या स्पामध्ये वेश्या व्यवसाय व इतर अनैतिक व्यवहार चालू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. हणजूण पंचायत व हणजूण पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याने श्रीरामपुरुष राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थान हणजूणचे अध्यक्ष व विद्यमान पंच हनुमंत गोवेकर यांनी सुमारे 100 लोकांच्या सह्यांचे निवेदन पोलिसांना देण्यासाठी स्टार्को जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात केली व पोलिस स्टेशनपर्यंत मोर्चा आणला.

दरम्यान, मोर्चा काढल्याचे समजताच स्पातील कर्मचार्‍यांनी आस्थापनाचे दरवाजे बंद करून पळ काढला. त्यातील तिघांना मोर्चेवाल्यांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. 

निरीक्षक नवलेश देसाई यांनी त्वरित सदर स्पावर धाड घातली असता दोन व्यक्‍ती लपून बसलेल्या सापडल्या व दोन तरुणीही हाती लागल्या. एकूण पाच जणांना अटक करण्यात आली तर तरुणींना सुधारगृहात पाठवण्यात आले. अटक करण्यात आलेल्यात शकीर हुसेन (वय 28, उत्तर प्रदेश), नदिम खान (29, मध्य प्रदेश), शशांक वारंग (33, सांवतवाडा), कृपाशंकर (24, उत्तर प्रदेश), आलीम अंसारी (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

दरम्यान, सरपंच सावियो डिसौजा पोलिस स्थानकात हजर झाले व त्यांनी मोर्चेवाल्यांचे अभिनंदन केले. या स्पा विरोधात कारवाई करण्याची विनंती आपण पोलिसांना केली होती. परंतु त्यावेळी त्यांनी केली नाही. देवस्थानच्या भाविकांनी पुढाकार घेतला म्हणून आजची कारवाई झाली. अशा बेकायदा व्यवसाय करणार्‍यांचा परवाना रद्द केला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली.

श्रीराम पुरुष राष्ट्रोळी देवस्थानचे उपाध्यक्ष व पंच सदस्य हनुमान गोवेकर म्हणाले की ह्या स्पामुळे या परिसरात पर्यटकांना लुटण्यात येते होते. स्थानिक लोकांवर त्याचा विपरित परिणाम होतो. गांवच्या युवतींना रस्त्यावरुन चालत जाणेही मुश्कील होते. आमच्या गावात अशा प्रकारांना थारा दिला जाऊ नये व या विषयाचे कुणीही राजकारण करु नये, असे आवाहन त्यांनी केले.