Wed, Jul 08, 2020 12:19होमपेज › Goa › ‘रेंट अ कॅब’साठी नव्याने परवाने नको

‘रेंट अ कॅब’साठी नव्याने परवाने नको

Published On: Jul 03 2019 1:52AM | Last Updated: Jul 03 2019 12:01AM
पणजी : प्रतिनिधी
राज्यात बर्‍याच ठिकाणी बेकायदेशीरपणे रेंट अ कॅबचा व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे वाहतूक खात्याने पुढील काही वर्षांसाठी नवे परवाने जारी करण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी करीत उत्तर गोवा रेंट अ कॅब संघटनेतर्फे मंगळवारी वाहतूक खात्यावर धडक मोर्चा नेला. टुरिस्ट टॅक्सी चालकांना रेंट अ कॅब परमिट देण्यालाही यावेळी तीव्र विरोध करण्यात आला. या मोर्चात 50 हून अधिक रेंट अ कॅब व्यावसायिक सहभागी झाले होते.

उत्तर गोवा रेंट अ कॅब संघटनेचे अध्यक्ष रामदास पालकर म्हणाले, राज्यातील टुरिस्ट टॅक्सी चालकांना रेंट अ कॅब परमिट जारी करण्यात आले आहेत. नियमांनुसार रेंट अ कॅब व्यावसायिकांनी आपली कार्यालये खुली ठेवणे आवश्यक आहेत. मात्र, उत्तर गोव्यातील बहुतेक रेंट अ कॅब परमिट असलेल्या टॅक्सी चालकांनी आपली कार्यालये बंद ठेवली आहेत. त्यामुळे वाहतूक खात्याला जर या कार्यालयांना भेट द्यायची असल्यास त्यांना ती देता येत नाही. अशा प्रकारे कार्यालये बंद ठेवणे पूर्णपणे अयोग्य असून संबंधित टॅक्सी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आमदारांच्या दबावामुळे वाहतूक खात्याकडून या टुरीस्ट टॅक्सी चालकांवर कारवाई केली जात नाही. कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणतात आपल्यामुळे रेंट अ कॅब व्यावसायिकांना परमीट मिळालेत. प्रत्यक्षात हे विधान खोटे आहे. उत्तर गोवा रेंट अ कॅब व्यावसायिकांनी न्यायालयात लढा दिल्यानंतर परमीट मिळाली होती. परंतु टुरीस्ट टॅक्सी चालकांना थेट ही परमीट दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यात सध्या 4 ते 5 हजार रेंट अ कॅब वाहने कार्यरत आहेत. त्यांची संख्या वाढत असून त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. त्याचबरोबर पार्कींग समस्या हा मुद्यादेखील असून बेकायदेशीररित्यादेखील हा व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे त्यावर मर्यादा येणे आवश्यक असून परमीट जारी करण्यावर काही वर्षे निर्बंध घालावेत, अशी मागणी पालकर यांनी केली.

‘दाबोळी’वरील बेकायदा ‘रेंट अ कॅब’वर कारवाई करा 

दाबोळी विमानतळावर पुष्कर ट्रॅव्हल्स नावाने एक व्यक्‍ती बेकायदेशीरपणे रेंट अ कॅब व्यवसाय करीत आहे. त्याच्याकडे वाहतूक खाते तसेच अन्य संबंधित खात्यांची कुठलीही परवनगी नसल्याचा आरोप रेंट अ कॅब संघटनेचे उपाध्यक्ष नितेश चोडणकर यांनी केला. वाहतूक खात्याने त्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.