Mon, May 25, 2020 03:35होमपेज › Goa › खाणबंदीवर न्यायालयातूनच योग्य तोडगा  

खाणबंदीवर न्यायालयातूनच योग्य तोडगा  

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात लागू असलेल्या खाणबंदीवर लवकरच न्यायालयाच्याच माध्यमातून योग्य तोडगा काढू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत  केंद्र सरकारचे गोव्याकडे पूर्ण लक्ष असून राज्यातील सर्व लहान-सहान समस्यांबाबत स्थानिक नेते केंद्राशी सतत संपर्कात आहेत.   गोव्याचे कोणतेही काम रखडणार नाही, असे आश्‍वासन आपण पर्रीकर यांना दिले आहे, असेही शहा म्हणाले.

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर रविवारी झालेल्या राज्यभरातील बूथ कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात शहा बोलत होते.   शहा म्हणाले की, ज्या-ज्या राज्यांत भाजप सरकार सत्तेत आहे, तिथे-तिथे सर्वांगीण विकासाची गंगा आली आहे. भाजपच्या यशामागे तळमळीचा बूथ कार्यकर्ता हा आधार असून तोच पक्षाचा कणा आणि आत्माही आहे. नववधूच्या माथ्यावर जसा लहानसा कुंकवाचा टिळा सौंदर्य आणखी वाढवतो, तसे लहानसे गोवा राज्य भारतमातेच्या भाळीची ‘बिंदीया’ बनून सजते आहे. या राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी राज्यातील सर्व 1600 हून अधिक भाजप बूथवरील कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे.  येत्या 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपलाच मिळणार, यात शंका नाही. यापुढील     विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात एकूण चाळीस जागांपैकी 35 भाजप जिंकू शकेल, असा विश्‍वासही शहा यांनी व्यक्‍त केला.

शहा म्हणाले, आपणही 1982 साली साधा बूथ कार्यकर्ता होतो, आज जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा अध्यक्ष बनलो आहे. एक चहावाला पंतप्रधान भारतीय जनता पक्षामुळेच बनू शकला आहे. अन्य पक्षात जन्माने कोणत्या जातीचा, अथवा घराणेशाहीची प्रभावळ असणाराच नेता ठरतो. भाजप पक्षाचे संघटन आणि विकास या दोन सक्षम बाजू असून त्याच अन्य राजकीय पक्षांपासून भाजपचे वेगळेपण दाखवत आहेत. फक्‍त दहा सदस्य असलेला पक्ष आज 11 कोटी सदस्य असून देशभरात सुमारे 1800 आमदार, 330हून अधिक खासदार आणि सर्वाधिक नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य असलेले कार्यकर्ते आहेत. 

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले की, मागील सुमारे 60 वर्षे देशात राज्य करूनही सुमारे 19 हजार गावांमध्ये विजेची सोय उपलब्ध करून देण्यात राहुल गांधींच्या काँग्रेसला अपयश आले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी  सत्तेवर येताच चार वर्षात भाजप आघाडी सरकारने देशातील सर्व गावांत वीज  पोहचवली असून सुमारे 50 लाख गरिबांच्या घरात वीज नेली आहे.  सुमारे 50 लाख बँक खाती उघडण्यात आली असून 11 कोटी युवकांना मुद्रा योजनेअंतर्गत सुलभ कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. तर 7 कोटी घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. 

यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, गोवा प्रभारी अविनाश खन्ना, संघटन मंत्री बी. एल. संतोषी, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा व अन्य नेते-पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला स्टेडियम खचाखच भरले होते. दोन्ही बाजूचे स्टँडमध्येही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन शर्मद रायतूरकर  तसेच सुलक्षणा सावंत यांनी केले.