Mon, May 25, 2020 09:44होमपेज › Goa › कर्नाटक निवडणुकांसाठी म्हादईचा सौदा

कर्नाटक निवडणुकांसाठी म्हादईचा सौदा

Last Updated: Nov 02 2019 2:22AM
पेडणे : प्रतिनिधी

केंद्रातील भाजप सरकार आणि राज्य सरकार गोव्याचे पर्यावरण नष्ट करु पाहत आहे. कर्नाटकातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हादईचा सौदा करण्यास गोव्यातील व केंद्रातील भाजप सरकार पुढे सरसावले आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पेडणे येथे केली. सरकारच्या म्हादईप्रश्नी होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करून म्हादईचा सौदा होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

म्हादई नदीचे पाणी वापरण्यासाठी कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण दखला दिल्याप्रकरणी गोवा काँग्रेस प्रदेशच्यावतीने शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून म्हादईबाबत तालुका पातळीवर आंदोलन करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी पेडणे तालुक्यातून या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने कळसा भांडुरासाठी दिलेला पर्यावरण दाखला तत्वरीत मागे घ्यावा या संबंधीचे निवेदन सादर केले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी शिक्षण मंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, ट्रोजन डिमेलो, उपाध्यक्ष बाबी बागकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष केरकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, पेडणे गटाध्यक्ष उमेश तळवणेकर, नारायण रेडकर, अनिल बर्डे, प्रमेश मयेकर, विठू महाले, रशेष बोंद्रे, रेखा परब, सखाराम परब, दिलीप होळकर, दशरथ महाले, प्नारशांत आरोलकर, जोझेफ डिसोझा, नारायण मयेकर, रामनाथ बगळी, सुरेश सावंत, मधुकर पेडणेकर, दत्ताराम नाईक, उत्तम कशालकर, मिंगेल फर्नांडिस, नंदकिशोर न्हाजी, सुरेश सावंत, बाबुसो तळकर, चंद्रकांत जाधव, यशवंत मळीक आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चोडणकर पुढे म्हणाले, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. या नदीच्या पाण्यावर गोवा राज्याचे भवितव्य आवलंबून आहे. या नदीचे पाणी वळवल्यास गोव्यातील जनतेवर भविष्यात मोठे संकट पाण्यासाठी येणार आहे. शेती, बागायती, व्यावसाय याला मोठा फटका बसणार असून म्हादई बचावासाठी सर्वांनी एक होऊन आंदोलन करावे लागणार आहे.

चोडणकर म्हणाले, पेडणेतून आज ही म्हादई बचावासाठी आंदोलनाची सुरुवात होत असून पेडणेतून जी जी चळवळ यपूर्वी झाली तिला यश प्राप्त झाले. आजच्या ह्या म्हादईच्या चळवळीला निश्चितच यश मिळणार, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान व राष्ट्रपती यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्याकडे चर्चेसाठी न्यावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली. यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे शिष्टमंडळ दिल्लीत नेऊन हा विषय सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी गोवा राज्याची वाट लावली, असे सांगून जावडेकर हे म्हादईच्या विषयात मुख्य सूञधार असून त्यांनी गोव्याचे हित न पाहता म्हादई विषय हा सर्वोच्च न्यायालत असताना पर्यावरण दाखला देऊन कर्नाटक सरकारला झुकते माप दिले आहे. अशा व्यक्तीला परत भेटून काही फायदा होणार नसून देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना शिष्टमंडळाने भेटावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी म्हादईच्या बचावासाठी खास एक दिवशीय आधिवेशन घ्यावे, अशी मागणी केली.

माजी मंत्री संगीता परब म्हणाल्या, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. ती संपविण्याचा सरकारने घाट घातला असून मुख्यमंत्री  डॉ.प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करावा न पेक्षा भविष्यात याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागतील, असे सांगून मुख्यमंत्री यांची आता खरी सत्व परीक्षा आहे. 

अमरनाथ पणजीकर म्हणाले भाजप सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. केंद्रात, गोवा राज्यात तसेच कर्नाटक राज्यात भाजप सरकार आहे. म्हदईचा लढा सर्वोच्च न्यालयात सुरु आहे. असे असताना कर्नाटक राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारला झुकते माप दिले. यासाठी गोव्यातील जनतेने आता एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली असून हे फक्त काँग्रेस पक्षाचे आंदोलन नसून समस्त जनतेने यात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बाबी बागकर, उमेश तळवणेकर, नारायण रेडकर आदींनी भाषणे करुन भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या .