Thu, May 28, 2020 06:16होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत ‘आयपीबी’ची बैठक 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत ‘आयपीबी’ची बैठक 

Published On: Oct 31 2018 1:48AM | Last Updated: Oct 30 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) 22 वी  बैठक मंगळवारी घेण्यात आली. ‘आयपीबी’तर्फे  एकूण 7 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यातून  एकूण 230 कोटी रुपये गुंतवणूक आणि सुमारे 400 जणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. 

मुख्यमंत्री पर्रीकर हे ‘आयपीबी’चे पदसिद्ध अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयपीबी’ची अनेक महिन्यांच्या खंडानंतर  बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी प्रथमच करंजाळे-दोनापावल येथील आपल्या खासगी निवासस्थानी ‘आयपीबी’ची बैठक घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत  माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री तथा  ‘आयपीबी’चे उपाध्यक्ष रोहन खंवटे  तसेच पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि अन्य सदस्य व अधिकारी हजर होते. 

बैठकीनंतर मंत्री खंवटे यांनी पत्रकारांना सांगितले, की या बैठकीत एकूण तेरा प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली असून त्यातील अकरा नवे प्रस्ताव आणि दोन जुने प्रकल्प बैठकीत चर्चेसाठी आले.  नव्या प्रकल्पांपैकी सात प्रस्तावांना मंजुरी दिली गेली असून चार प्रकल्पांबाबत निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे ठरवण्यात आले. निर्मिती उद्योगासह विविध प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने एकूण 230 कोटींची गुंतवणूक गोव्यात होणार आहे.  सुमारे चारशे रोजगार संधी आता निर्माण होतील. सरकारला चांगले गुंतवणूकदार गोव्यात आलेले हवे आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्याने यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘आयपीबी’च्या बैठकीला प्रत्यक्षात हजर नव्हते. ‘व्हीडिओ कॉन्फरन्सींग’द्वारे सुमारे दहा मिनिटे  अध्यक्षस्थानावरून त्यांनी मार्गदर्शन केले होते. या बैठकीत सर्व प्रकल्पांबाबत चर्चा करून ती पुढील बैठकीत निर्णय घेऊया, असे पर्रीकर यांनी विनंती केली होती. त्यानुसार, मंगळवारची आयपीबीची बैठक ही ‘पुढे चालू’  (इन कंटीन्यू)अशी घेण्यात आली आहे, असे आयटी मंत्री रोहन खंवटे  यांनी सांगितले. 

पर्रीकरांची तब्येत ठीक ः खंवटे

मनोहर पर्रीकर हे मंगळवारी आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या स्थितीत होते. विरोधक जो संशय निर्माण करत आहेत, तो या बैठकीमुळे दूर झाला. मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून काही सूचनाही केल्या जेणेकरून पुढे कसे जावे, हे स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या बैठका भविष्यात होणार आहेत, असे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.