Mon, May 25, 2020 13:22होमपेज › Goa › मनोहर पर्रीकर हे सर्वोत्तम संरक्षणमंत्री : नितीन गोखले

मनोहर पर्रीकर हे सर्वोत्तम संरक्षणमंत्री : नितीन गोखले

Last Updated: Dec 18 2019 1:13AM
म्हापसा  : प्रतिनिधी

अभ्यासूवृत्ती, त्वरित  निर्णय घेण्याची क्षमता,  कामातील पारदर्शकता,  दलालांना  बाजूला करून खर्च कमी करण्याची जिद्द व राजकीय डावपेच, देशासाठी धाडसी निर्णय घेण्याची हिम्मत यामुळे स्व. मनोहर पर्रीकर हे सर्वोत्तम संरक्षणमंत्री ठरले,  असे मत   साहित्यिक नितीन गोखले यांनी व्यक्त केले. 

मनोहर पर्रीकर प्रतिष्ठान तर्फे म्हापसा खोर्ली येथील  गिरी केणी  सभागृहात आयोजित केलेल्या मनोहर पर्रीकर  व्याख्यानमालेत नितीन गोखले बोलत होते.  व्यासपीठावर  केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक,  सभापती राजेश पाटणेकर, रुपेश कामत,  नगरसेवक सुशांत हरमलकर, दिलीप महाले उपस्थित होते.

नितीन गोखले म्हणाले, की मनोहर पर्रीकर आणि इतर संरक्षण मंत्र्यांमध्ये खूप फरक दिसून आला.   कामाच्या फाईल्स सखोल  वाचणे,  विषय समजून घेणे त्यासाठी प्रत्यक्ष त्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करणे आणि त्यानंतर निर्णय घणे अशी पर्रीकरांची कार्यशली होती. संरक्षण दलात मंत्र्यांकडे थेट  बोलणे होत नसे. पर्रीकरांनी अधिकार्‍यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. संरक्षण दलाला ज्या वस्तू हव्यात त्या मिळवून देताना मधल्या दलांना त्यांनी बाजूला करून हजारो रुपयांचा फायदा देशाला केला.  

संरक्षण खात्यात  2005 ते 2014 या काळात  सुसूत्रता नव्हती.  एकमेकांवर विश्वास नव्हता, पर्रीकरांनी अधिकार्‍यांमध्ये विश्वास निर्माण केला.  कामात सुसूत्रता आणली. अधिकार्‍यांना मंत्रिपदाचा धाक न दाखवता त्यांच्या अडचणी व समस्या  ऐकून घेतल्या. संरक्षण साहित्य विकत घेण्यासाठी  कमिटी स्थापन केली.  सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान अधिकार्‍यांना बोलावून घेऊन सूचना द्यायला सुरुवात केली.  स्वतः  17 तास काम करून सर्वांना कार्यरत केले.  आठ ते नऊ तास बैठक घेऊन निर्णय घेतले. तेजस विमान   किंवा राफेल   विमान घेण्याचा निर्णय देश हित लक्षात घेऊन घेतला.  त्यांचा बंगला म्हणजे युवकांचे स्फूर्तिस्थान होत, असेही गोखले म्हणाले.  

स्व. पर्रीकरांना  दुसर्‍यांचे ऐकून  घेण्याची सवय होती.  कमी बोलून दुसर्‍याचं ऐकून घेणारा खरा नेता असतो.  स्वतः साधी रहाणी पत्करणारे ते  होते. कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची शहानिशा करून  नंतरच विश्वास ठेवायचे.   सर्जिकल स्ट्राइक करून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला.  राजकारण्यात  हिंमत असायला हवी ती त्यांच्यात होती. युद्धाची तयारी चाळीस दिवसांची न करता दहा दिवसात ते संपवायला हवं अशी धारणा ठेवून ते वागत होते.  देशासाठी कुणाचीही  पर्वा न करणारे मनोहर पर्रीकर महान राष्ट्रप्रेमी संरक्षण मंत्री    होते, असे ते  म्हणाले.

रुपेश कामत यांनी वक्त्यांचा परिचय केला.  कीर्ती सावरकर यांनी  सूत्रसंचालन केले.  अखिल पर्रीकर यांनी आभार मानले.