Sun, May 31, 2020 16:09होमपेज › Goa › विर्नोडा येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

विर्नोडा येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Last Updated: Jan 14 2020 11:50PM
पेडणे : प्रतिनिधी 
विर्नोडा-ओशालबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंदब  महामंडळात चालक असलेले ज्ञानेश्‍वर विठ्ठल नाईक  (वय 55, रा. मधलावाडा-विर्नोडा) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दुचाकीवरून (जी.ए 11 सी 0664) ओशालबाग येथून विर्नोडा येथे घरी जात असताना अज्ञात वाहनाने ज्ञानेश्‍वर नाईक यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू  झाला. ज्ञानेश्वर नाईक हे विर्नोडा येथील रहिवाशी असून ते कामानिमित्त ओशालबाग येथे आपल्या दुचाकीवरून गेले होते. ते परत रात्री 8 च्या दरम्यान आपल्या विर्नोडा 

येथील घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली व अपघातानंतर चालक गाडीसह पसार झाला. सदर धडक इतकी जोरदार होती की ज्ञानेश्वर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती पेडणे पोलिसांना मिळताच पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह गोवा वैद्यकीय इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवला.
पंधरा दिवसांपूर्वी विर्नोडा नागरिक कृती समितीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना बोलावून या रस्त्याबाबतच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या  होत्या. हा रस्ता जीवघेणा असल्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना व संबंधित  अधिकार्‍यांना सांगितले होते. मात्र रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कुठल्याच प्रकारची दक्षता घेण्यास कंत्राटदाराला सांगितले नसल्यामुळे हा अपघात होऊन विर्नोडा येथील  रहिवाशाचा बळी गेल्याचे  माजी सरपंच कृष्णा परब यांनी सांगितले.