Fri, May 29, 2020 22:05होमपेज › Goa › काणकोण बगल मार्गाला स्व. पर्रीकरांचे नाव

काणकोण बगल मार्गाला स्व. पर्रीकरांचे नाव

Last Updated: Nov 29 2019 10:33PM
काणकोण : प्रतिनिधी  

284 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या काणकोण बगल मार्गाचे नामकरण  ‘मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर बगल मार्ग’ असे  करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी  चार रस्ता ते माशे चौपदरी रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर  झालेल्या कार्यक्रमात बोलताना केली.    

व्यासपीठावर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर, वीजमंत्री नीलेश क्राबाल, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पैखोत, उत्पल परीकर, नगराध्यक्ष नीतू देसाई, उपनगराध्यक्ष हेमंत नाईक गावकर, खोला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य डॉ. पुष्पा अया, उपजिल्हाधिकारी विकास कांबळे, नगरसेवक, सरपंच, कंत्राटदार एन.एम.राव, मुख्य अभियंता  उमेश  कुलकर्णी  होते.       

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, आपले सरकार सामान्य लोकांसाठी आहे. पुढील दोन वर्षात काणकोण तालुक्यातील लोकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. या बगलमार्गामुळे काणकोणात पर्यटन व्यवसाय वाढणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जंगल ही समस्या होऊ न देता ते उत्पादनाचे साधन बनले पाहिजे , असेही डॉ. सावंत म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी सांगितले, की  हा बगल रस्ता तीन नद्यांवर बांधण्यात आला असून ही एक चांगली गोष्ट असून असे प्रकार ब्राझिल देशात पाहायला मिळतात. गोव्यात 95 % लोकांना पिण्याचे पाणी मिळते, हे एकून आपण चकित झालो असल्याचेही त्यांनी सांगितले. दीपक पाऊसकर, नीलेश क्राबाल, इजिदोर फर्नांडिस यांची यावेळी भाषणे झाली. मुख्य अभियंता उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  करून  स्वागत केले.

सूत्रसंचालन रूपा च्यारी यांनी केले. नगराध्यक्ष नीतू देसाई यांनी आभार मानले. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच इतर मंत्र्यांनी या चौपदरी रस्त्यावरुन फेरी मारून रस्त्याची पाहणी केली.