Tue, May 26, 2020 08:45होमपेज › Goa › नोकरीच्या आमिषाने साडेसात लाखांचा गंडा

नोकरीच्या आमिषाने साडेसात लाखांचा गंडा

Last Updated: Jan 04 2020 1:37AM
मडगाव : प्रतिनिधी

सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार या पूर्वी अनेकवेळा घडले आहेत. आता कुडचडे येथील एका व्यक्तीला तब्बल साडेसात लाख रुपयांना फटका बसल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पैसे स्वीकारणार्‍या व्यक्तीने आपण उत्तर गोव्यातील एका मंत्र्यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगून सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी पन्नास टक्के आगाऊ रक्कम म्हणून साडेसात लाख रुपये उकळले आहेत.

प्राप्त माहितीनुसार कुडचडे येथील एका व्यावसायिकाने त्यांच्या नातेवाईकांबरोबर अन्य एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी पर्वरीस्थित त्या युवकाकडे पैसे दिले होते. पैसे देऊनही काम न झाल्याने त्यांनी त्या युवकाकडे पैशांबद्दल विचारणा केली असता त्याच्याकडून त्यांना व्यवस्थित उत्तर मिळाले नाही.त्या युवकाची सविस्तर चौकशी केली असता त्या मंत्र्यांचा स्वीय सचिव दुसराच असल्याचे त्यांना कळून आले. आपले पितळ उघडे पडल्याचे कळून आल्यानंतर त्या युवकाने आपला फोन बंद केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. कुडचडेस्थित व्यावसायिकाचा फ्लॅट फातोर्डा भागात आहे. पैसे घेऊन पसार झालेल्या युवकाची व त्यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.त्याच्या फेसबुकवर उत्तर गोव्यातील एका मंत्र्यांचे असंख्य फोटो आहेत.आपण त्या मंत्र्यांचा स्वीय सचिव असून मंत्र्यांच्या खात्यात सरकारी नोकरी आपण देऊ शकतो, अशी बतावणी त्याने केली होती. त्याच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून सदर व्यावसायिकाने त्याला आपल्या फातोर्डा येथील फ्लॅटवर बोलावून पैसे दिले. तर पैशांचा दुसरा हफ्ता गोमेकॉच्या परिसरात दिला होता.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण साडेसात लाख रुपये त्यांनी त्या युवकाला नोकरी देण्यासाठी दिले होते. पैसे देऊन महिना उलटला तरी नोकरीचे नियुक्ती पत्र न मिळाल्याने त्यांनी त्या युवकाशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरू केले. सध्या त्याने आपला मोबाईल बंद ठेवला आहे. या युवकाने अनेक लोकांना अशाच प्रकारे लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार आता समोर येत आहे. लोकांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील त्या मंत्र्यांशी संपर्क साधून चौकशी केली असता आपण त्या युवकाला ओळखत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी फोंडा तालुक्यात अशाच स्वरूपाचे प्रकरण घडले होते. एका युवकाच्या आत्महत्येनंतर या प्रकाराला वाचा फुटली होती. याच परिसरातील एका लोकप्रतिनिधीच्या जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली होती. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणार्‍या युवकांना जाळ्यात ओढून त्यांना लाखो रुपयांना गंडवणार्‍या ठकसेनांची टोळी सध्या राज्यात कार्यरत झाली आहे, असा कयास व्यक्त होत आहे. बेरोजगार युवक कर्ज काढून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्या टोळीला पैसे देऊ लागले आहेत. सर्व व्यवहार रोकड पद्धतीने होत असल्याने अनेक युवक त्यात फसू लागले आहेत. एका वरिष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला याबद्दल विचारले असता सरकारी नोकरीच्या अमिषाने स्वतःची फसगत करून घेतलेल्या तरुणांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.