Thu, May 28, 2020 05:45होमपेज › Goa › पैशाच्या वादातून एका मजूराने दुसऱ्या मजूराला भोकसले 

पैशाच्या वादातून एका मजूराने दुसऱ्या मजूराला भोकसले 

Published On: Jul 23 2019 10:43PM | Last Updated: Jul 23 2019 10:49PM
मडगाव : प्रतिनिधी

पैशाच्या क्षुल्लक कारणावरून गांधी मार्केट परिसरात दोन मजूर मित्रांमध्ये झालेल्या भांडणात प्रदीप माने (३०, कर्नाटक) याच्या पोटात सुरा भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी मोहमद जमीर उर्फ शाहीर (२८, कर्नाटक) या संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाल्याने त्याला गोमेकॉच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे तर किरकोळ जखमी झालेल्या संशयिताला हॉस्पिसियो इस्पितळात भरती करण्यात आले आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गांधी मार्केट परिसरात सदर प्रकार घडला. जमीर आणि प्रदीप हे दोघेही मूळ कर्नाटकातील रहिवासी असून सध्या पीकअप लोडर म्हणून काम करून पोटापाण्याची व्यवस्था करत होते. सध्या गांधी मार्केट परिसरातच ते वास्तव्यास होते. सोमवारी पैशावरुन प्रदीप आणि जमीरमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी दोघांनीही एकमेकांवर सुऱ्याने हल्ला केला. दरम्यान जमीर याने रागाच्या भरात हातातील सुरा प्रदीपच्या पोटात खुपसला आणि त्याला गंभीर जखमी केले. 

पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच तक्रार दाखल करून जमीर याला मीनाक्षी हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी गंभीर जखमी झाल्याने माने याला हॉस्पिसियोतुन गोमेकॉत पाठविण्यात आले तर जमीर किरकोळ जखमी झाल्याने त्याला हॉस्पिसियोत भरती करण्यात आले आहे. माने याची स्थिती गंभीर झाल्याने त्याला उशिरा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित जमीर याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष परब याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.