Mon, May 25, 2020 14:21होमपेज › Goa › भाजप सरकार पाडणे कुणालाही अशक्य

भाजप सरकार पाडणे कुणालाही अशक्य

Published On: May 13 2019 2:16AM | Last Updated: May 13 2019 2:16AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील भाजप आघाडीचे सरकार पाडणे कुणालाही शक्य नाही. सरकारला अन्य पक्षाच्या आणखी दोन आमदारांचा पाठिंबा लाभणार असल्याने आघाडी सरकारचे संख्याबळ 26 इतके होईल, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

लोकसभेच्या दोन्ही जागांबरोबरच भाजप चारही विधानसभा मतदारसंघांत होणार्‍या पोटनिवडणुकांमध्येही विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेंडुलकर म्हणाले, 23 मे च्या निवडणूक निकालानंतर गोव्यातील विद्यमान भाजप आघाडी सरकार पाडून आपले सरकार स्थापन करण्याचे स्वप्न काँग्रेस पहात आहे. त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. 

मतमोजणीनंतर भाजप आमदारांची संख्या 18 होईल. सरकारला युती पक्ष तसेच अपक्ष असे मिळून सहा आमदारांचा पाठिंबा आहे, तर अन्य पक्षांच्या आणखी दोन आमदारांचा पाठिंबा लाभणार आहे. त्यामुळे विधानसभेत भाजप आघाडी सरकारचे संख्याबळ वाढून 26 होईल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारच्या काळात ताळगाव येथील आयटी पार्कला बाबूश मोन्सेरात यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणदेखील केली होती. त्यावेळी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोेडणकर यांनी मोन्सेरात यांना काँग्रेसमध्ये कदापी प्रवेश देणार नाही. त्यांना प्रवेश दिल्यास आपण पक्षत्याग करू, असा इशारा दिला होता. मात्र, आता तो इशारा हवेत विरला असून त्याच मोन्सेरात यांना पक्षात प्रवेश देण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याची टीका तेंडुलकर यांनी केली.

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना प्रचारात उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे, असे चित्र दिसत असल्याने चोडणकर गोंधळल्याची टीका तेंडूलकर यांनी केली.
यावेळी दिलीप परुळेकर, अनिल होबळे व अन्य उपस्थित होते.

मोन्सेरातनी तेव्हा का विरोध केला नाही : तेंडुलकर 

मांडवीत असलेल्या सहा कॅसिनोंना परवानगी देणारे हे काँग्रेसचेच सरकार होते. बाबूश मोन्सेरात यांनी जाहीरनाम्यात 100 दिवसांत कॅसिनो हटवण्याचे आश्‍वासन दिले आहे. मग कॅसिनोंना काँग्रेस सरकारने परवानगी दिली होती, तेव्हाच मोन्सेरात यांनी विरोध का केला नाही, असा प्रश्‍नही भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी उपस्थित केला.