Wed, Jul 08, 2020 11:56होमपेज › Goa › ग्रीन गोवा, क्लीन गोवा अभियानाचा आज आरंभ

ग्रीन गोवा, क्लीन गोवा अभियानाचा आज आरंभ

Published On: May 30 2019 1:33AM | Last Updated: May 30 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

घटक राज्य दिनानिमित  स्वच्छ भारत अभियानांतर्गत  गोवा सरकार  ‘ग्रीन  गोवा क्लीन गोवा’  या अभियानाची सुरुवात करणार  आहे. पुढील काही वर्षांत गोवा कचरामुक्त केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘होम कंपोस्टिंग युनिट’चे उद्घाटन  करण्यात आले. प्रत्येकांनी घराघरात या युनिटचा वापर करून कचर्‍याची विल्हेवाट लावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,  सरकारकडून कचरा वर्गीकरण तसेच कचरा  प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे. त्यानुसार  ‘ग्रीन  गोवा क्लीन गोवा’  या अभियानांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी  प्रत्येकाकडून स्वच्छतेची शपथ घेतली जाणार आहे. आपण ही शपथ घेतली  असून उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांना ही शपथ दिल्याचे त्यांनी सांगितले.

घटकराज्य दिनानिमित आज, 30 मे रोजी स्वच्छतेवर उत्तर गोव्यात पणजीतील मिनेझिस ब्रांगांझा सभागृह तसेच दक्षिण गोव्यात मडगाव येथील विद्या निकेतन सभागृहात कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्यातील पंचायतींचे सरपंच  तसेच पालिकांच्या नगराध्यक्षांना निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत  पंचायत तसेच पालिकांसाठी स्वच्छतेसंदर्भात खास स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 12 लाख, 10 लाख व 8 लाख अशी अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे बक्षिस असेल असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

होम कंपोस्टींग युनिटचा वापर घरोघरी व्हावा. या युनिटच्या खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाईल.  गोवा  येत्या काही वर्षांत कचरामुक्त  केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारकडून युवक केंद्रीत विषयांवर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यात रोजगार, उच्च शिक्षण व शिक्षणाच्या संधी, कृषी क्षेत्राकडे जास्तीत जास्त लोकांनी वळावे यावर लक्ष देणे तसेच  पायाभूत सुविधांचा विकास यावर सरकारकडून भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.