Mon, May 25, 2020 02:58होमपेज › Goa › कॅसिनो,थिएटर्स परिसरात शुकशुकाट 

कॅसिनो,थिएटर्स परिसरात शुकशुकाट 

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कॅसिनो व थिएटर्स  सोमवारपासून बंद ठेवण्यात आली असून याठिकाणी शुकशुकाट पसरला आहे. कॅसिनोंमधील कर्मचार्‍यांव्यतिरिक्त अन्य कुणीही फिरकत नसल्याने एरव्ही  लोकांच्या गर्दीमुळे गजबजणारी ही दोन्ही ठिकाणी आता सुनी सुनी झाली आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये,यासाठी खबरदारी म्हणून गर्दीची  ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सरकारला मात्र या दोन्ही उद्योगांकडून मिळणार्‍या महसूलापासून काही दिवसांसाठी मुकावे लागणार आहे.  

सरकारने कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर शाळा, कॉलेज, पब, क्‍लब, कॅसिनो, थिएटर आदी गर्दीची ठिकाणे  31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पणजीतील मांडवी नदी पात्रात असलेले सर्व सहा कॅसिनो सोमवार पासून बंद ठेवण्यात आले आहेत.या कॅसिनोंमध्ये सध्या केवळ कर्मचारी वर्गालाच प्रवेश दिला जात आहे.

पणजीतील कॅसिनों हे देशी विदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. संध्याकाळच्या वेळी तर  कॅसिनोंमध्ये जाण्यासाठी  देशी पर्यटकांची अक्षरशः गर्दी असायची.  दरदिवशी या कॅसिनोंमधून सरकारला लाखो रुपयांचा महसूल प्राप्‍त व्हायचा. कॅसिनोंमध्ये होणार्‍या गर्दीमुळे  कॅप्टन ऑफ पोर्टस खाते ते जुने सचिवालयापर्यंत  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. त्यामुळे अन्य वाहन चालकांना ते अडचणीचे ठरते. मात्र सरकारने  31 मार्च पर्यंत कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गजबजलेले हे रस्ते एकदम रिकामे झाले.  

कॅसिनोंमध्ये खेळण्यासाठी  आलेल्या अनके पर्यटकांना तेथील सुरक्षारक्षकांनी परत पाठवले. कॅसिनों बंद ठेवण्याजा निर्णय सरकारने घेतला असला तरी कॅसिनों व्यवस्थापनांनी आपल्या कर्मचार्‍यांना रोजच्या प्रमाणे कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कॅसिनोंमध्ये कर्मचारी वगळताना अन्य कुणीही दिसून येत नाही.  कॅसिनों प्रमाणेच थिएटर्स देखील बंद ठेवण्यात आली आहेत.  राज्यातील अन्य थिएटर्स प्रमाणेच पणजीतील दोन  थिएटर्स तसेच आयनॉक्स देखील बंद  ठेवण्यात आले आहेत. तशी नोटीसही संबंधित थिएटर्सच्या बाहेर लावण्यात आली आहे.  त्यातही असेही काही प्रेक्षक आहेत ज्यांना हे थिएटर्स बंद असल्याची माहितीच नसल्याने ते तेथे चित्रपट पाहण्यासाठी गेले. मात्र त्यांना माघारी परतावे लागले. 

थिएटर्स उद्योगाला फटका ः प्रवीण झांट्ये

मयेचे आमदार तथा  राज्यातील  13 थिएटर्सचे मालक असलेले प्रवीण झांटये म्हणाले, की कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर  सरकारने राज्यातील थिएटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे थिएटर उद्योगाला मोठा फटका बसणार आहे.  थिएटर्स बंद ठेवण्यात आली असली तरी  या थिएटर्स मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा  पगार, वीज बिले  भरावीच लागणार आहेत. त्यात कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही. थिएटर्सच्या माध्यमातून  सरकारला  दरमहा मिळणार्‍या लाखो रुपयांच्या महसुलाला   मुकावे लागणार आहे.  त्यामुळे या निर्णयाला फटका केवळ थिएटर्स मालकांनाच नव्हे तर सरकारलाही महसूल स्वरुपात बसणार आहे.  त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहताना सरकारने त्याचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी  सांगितले.