Wed, Jul 08, 2020 14:06होमपेज › Goa › राज्यात मुसळधार; पाणी तुंबले

राज्यात मुसळधार; पाणी तुंबले

Published On: Aug 04 2019 1:50AM | Last Updated: Aug 04 2019 1:50AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात शनिवारी ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पणजीत सकाळपासून पडलेल्या पावसामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. पावसामुळे पाटो, कदंब बसस्थानक, कला अकादमी येथे पाणी तुंबल्याने लोकांची गैरसोय झाली. पुढील चार दिवस 7 ऑगस्टपर्यंत राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. 

पणजीत शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसामुळे पाटो, कदंब बसस्थानक, कला अकादमी तसेच ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले. पाण्यातून वाट काढताना वाहचालकांची तसेच पादचार्‍यांची दमछाक झाली. 

राज्यात 1 जून ते 3 ऑगस्ट पर्यंत 85 इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा मान्सूनचे प्रमाण आतापर्यंत 4 टक्के जास्तच आहे, अशी माहिती वेधशाळेकडून मिळाली. पावसाचा जोर सलग राहिल्यास लवकरच मान्सून पुढील आठवड्यापर्यंत इंचांची शंभरी पार करण्याची शक्यता आहे. पणजीसह राज्यात जुने गोवे, साखळी, वाळपई, मुरगाव, म्हापसा, पेडणे, दाबोळी, केपे भागात पावसाने हजेरी लावली. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार जुने गोवे येथे सर्वाधिक 57 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 

राज्यात गेल्या 24 तासांत तापमानात घट झाली असून कमाल तापमान 29.1 अंश सेल्सियस तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे. समुद्र खवळला असून समुद्रात वादळी वारे वाहत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.