Tue, May 26, 2020 09:51होमपेज › Goa › गोव्यात भाजपसाठी आधी खुशी, आधा गम

गोव्यात भाजपसाठी आधी खुशी, आधा गम

Published On: May 24 2019 2:27AM | Last Updated: May 25 2019 2:08AM
सुरेश स. नाईक, पणजी

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या यशाचा चौफेर डंका वाजत असताना गोव्यात मात्र यावेळी या यशात शंभर टक्के साथ देता आली नाही. लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा मतदारसंघाचा गड पाचव्यांदा सर करून विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांना गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करता आलेली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर यांच्याविना पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाताना भाजपला संमिश्र यशावर समाधान मानावे लागले आहे. लोकसभेच्या दोनपैकी एका जागेवर आणि राज्य विधानसभेच्या चार मतदारसंघांतील पोटनिवडणुकांपैकी तीन ठिकाणी भाजप यशस्वी झाला. मात्र, गेली पंचवीस वर्षे पर्रीकरांनी पणजीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले, तो मतदारसंघ दुर्दैवाने भाजपला राखता आला नाही. दोन्ही निवडणुकांचे निकाल हे भाजपसाठी आधी खुशी, आधा गम, असा अनुभव देणारे ठरले आहेत.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर खाणसंबंधी घटकांनी भाजपला असहकाराची, विरोधात मतदानाची भाषा वापरली होती. उत्तर गोव्यात त्याचा प्रभाव कमी होता. तरी दुधात मिठाच्या खड्यासारखा त्याचा अल्पसा उपद्रव श्रीपाद नाईक यांना आणि दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर यांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता होती. या प्रश्‍नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काही आश्‍वासक पावले उचलल्याने या मुद्द्यावरून होऊ शकणार्‍या नुकसानीची तीव्रता कमी झाली.

संघटनात्मक कार्य आणि प्रत्येक मतदारांशी जवळीकतेने संपर्क साधण्याची यंत्रणा भाजपने प्रभावीपणे राबविल्याने आणि श्रीपाद नाईक यांचा व्यक्तिगत प्रभाव, मतदारांशी असलेला सततचा संपर्क यामुळे श्रीपाद नाईक यांना यशाला गवसणी घालणे शक्य झाले. उत्तर गोव्यात भंडारी समाज लक्षणीय आहे. काँग्रेसने गिरीश चोडणकर यांना उमेदवारी देऊन या समाजाच्या मतांवर प्रभाव पाडण्याचा केलेला प्रयत्न श्रीपाद नाईक यांचा मतदारांशी आधीपासून असलेल्या संपर्कामुळे यशस्वी होऊ शकला नाही.

दक्षिण गोवा हा मतदारसंघ तसा काँग्रेसधार्जिणा राहिला आहे. सावईकर मागील वेळी निवडून आले तेव्हा त्यांचे मताधिक्यही लक्षणीय नव्हते. खाणप्रश्‍न सोडवण्याबाबत त्यांनी अनेकदा ठराविक मुदतीची आश्‍वासने दिली. प्रश्‍न सुटला नाही. काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे गेली पाच वर्षे राजकीयदृष्ट्या तसे सक्रिय नव्हते. परंतु, दक्षिण गोव्यात निर्णायक ठरणारी मते ख्रिस्तीबहुल सासष्टी तालुक्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील आहेत. ती निवडणुकीचा कल फिरवितात. ‘आप’चे एल्विस गोम्स या मतांमध्ये फारशी फाटाफूट करू शकले नाही.