Tue, May 26, 2020 05:31होमपेज › Goa › हडफडेत गेस्ट हाऊस मालकिणीचा खून

हडफडेत गेस्ट हाऊस मालकिणीचा खून

Published On: Oct 07 2019 1:59AM | Last Updated: Oct 07 2019 1:59AM
बार्देश ः प्रतिनिधी 

व्हिएगस-वाडा, हडफडे येथील एका खासगी गेस्ट हाऊसच्या मालकीण शिरीन मोदी (वय 65) यांचा प्रफुल्ला जना (60, मूळ रा.ओडिशा) या त्यांच्याच कामगाराने लोखंडी पाईपने हल्ला करून खून केला. हल्ल्यानंतर घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर कंपाऊंड वॉलवरून उडी मारून पळून जाताना गंभीर जखमी झाल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्या श्रीमती शिरीन यांना इस्पितळात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हणजूण पोलिस तसेच उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्क्रीष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाची ही घटना रविवारी सकाळी 11 ते 11:30 या कालावधीत घडली.  

 मृत शिरीन मोदी या येथील व्हिएगस वाड्यात गेली वीस वर्षे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्य करून राहात होत्या. घराशेजारीच त्या विदेशी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस चालवत होत्या. त्यांच्याकडे गेली तीन वर्षे माळी म्हणून काम करणार्‍या प्रफुल्ला जना याच्याशी रविवारी सकाळी श्रीमती मोदी यांची कामावरून बाचाबाची झाली. या भांडणात रागाच्या भरात प्रफुल्ला याने जवळच्या शेडमधील लोखंडी पाईप मोदी यांच्या डोक्यात जोरात हाणली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या. त्यावेळी भांडणाचा गोंधळ ऐकून त्याजागी धावत आलेल्या मोलकरीणीलाही जना याने ढकलून देऊन कंपाऊंड वॉलवरून उडी मारली व घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपाऊंडवरून उडी मारल्याने तोही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला.