Mon, Sep 16, 2019 06:26होमपेज › Goa › शालेय सुविधेमध्ये गोवा अव्वल; शैक्षणिक कामगिरीत २१व्या क्रमांकावर 

शालेय सुविधेमध्ये गोवा अव्वल; शैक्षणिक कामगिरीत २१व्या क्रमांकावर 

Published On: Mar 07 2019 6:50PM | Last Updated: Mar 07 2019 7:04PM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील शाळांना पुरवण्यात येत असलेली साधन सुविधा ही देशातील सर्वोत्कृष्ठ आहेत. शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयीमध्ये गोवा दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, असे असूनही शैक्षणिक क्षेत्रातील एकूण कामगिरीमध्ये राज्य देशात 21व्या स्थानावर असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या कामगिरी निर्देशांक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात, गोव्याला एकुण 1 हजार गुणांपैकी 738 गुण प्राप्त झाले आहेत. यामध्ये शैक्षणिक दर्जा (21 वा क्रमांक), शाळांची उपलब्धता (7वा क्रमांक), साधनसुविधा (2 रा क्रमांक), प्रशासकीय नियंत्रण (26वा) आणि निपक्षपाती (13 वा क्रमांक) मानांकन देण्यात आले आहे. 

राज्याला शालेय सुविधा तरतूदीसाठी पंजाब राज्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. गोव्याला साधनसुविधा विभागासाठी एकुण 150 पैकी 138 गुण मिळाले असून पंजाब केवळ एका गुणाने पुढे आहे. या विभागासाठी विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, मध्यान्ह आहार सुविधा, पिण्याचे पाणी,गणवेश, पाठ्यपुस्तके आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.