Wed, May 27, 2020 11:10होमपेज › Goa › कवळेकरांना नगरनियोजन; जेनिफरना महसूल, आयटी

कवळेकरांना नगरनियोजन; जेनिफरना महसूल, आयटी

Published On: Jul 16 2019 1:55AM | Last Updated: Jul 16 2019 1:55AM
पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात सामील झालेल्या नव्या चार मंत्र्यांना सोमवारी दुपारी खाते वाटप केले. सावंत यांनी मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांकडे असलेल्या काही खात्यांमध्ये बदलही केला आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, अभिलेख, पुरातत्व, कारखाना व बाष्पक आदी खाती देण्यात आली आहेत. जेनिफर मोन्सेरात यांना महसूल, आयटी तसेच कामगार आणि रोजगार खाती मिळाली आहेत. फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना जलस्त्रोत, मच्छीमार, वजन-माप खाती दिली गेली आहेत. मायकल लोबो यांना ग्रामीण विकास, घनकचरा व्यवस्थापन, बंदर आणि पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आदी खाती मिळाली आहेत.

मंत्रिमंडळातील खाते वाटपाची अधिसूचना विधानसभेचा पहिला दिवस संपल्यानंतरच सर्वसाधारण प्रशासन खात्याचे अव्वर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी सोमवारी संध्याकाळी जारी केली. काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या 10 आमदारांपैकी बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स, जेनिफर मोन्सेरात या तीन आमदारांना तसेच भाजपच्या मायकल लोबो यांना शनिवारी मंत्री पदाची शपथ देण्यात आली होती. या चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी विविध खाती देण्यात आली.

मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्याकडे गृह, वित्त, दक्षता, खाण, शिक्षण, वन आणि पशुसंवर्धन आदी महत्वाची खाती कायम ठेवली आहेत. मंत्रिमंडळातील आधीच्या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल करण्यात आले आहेत. माविन गुदिन्हो यांच्याकडे असलेली वाहतूक, राजशिष्टाचार आणि विधानसभा कामकाज ही खाती त्यांच्याकडेच ठेवण्यात आली असून त्यांना गृहनिर्माण हे अतिरिक्त खाते देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडील पशुसंवर्धन खाते काढून घेण्यात आले आहे.

निलेश काब्राल यांनी वीज, अपारंपरिक ऊर्जा राखले आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेले पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते लोबो यांना देण्यात आले असून कायदा आणि न्यायालय हे अतिरिक्‍त खाते काब्राल यांना प्राप्त झाले आहे. विश्‍वजीत राणे यांच्याकडील आरोग्य, उद्योग, महिला आणि बाल कल्याण ही खाती कायम ठेवली असून कायदा खाते काढून घेऊन त्यांना कौशल्य विकास खाते देण्यात आले आहे. 

मूळ भाजप मंत्र्यांची क्रमवारीत घसरण 

काँग्रेसच्या 10 आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना महत्वाची खाती मिळाल्याने राज्य मंत्रिमंडळात भाजप आमदारांचे स्थान मागे पडले आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असून त्यात बाबू कवळेकर यांना दुसरे आणि बाबू आजगावकर यांना तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, पहिल्यांदाच मंत्रिपद मिळवलेल्या महिला आमदार जेनिफर मोन्सेरात यांना चौथे स्थान मिळाले आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे पाचवे तर फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना सहावे स्थान प्राप्त झाले आहे. सातव्या स्थानावर मायकल लोबो, आठवे माविन गुदिन्हो, नववे विश्‍वजीत राणे, दहावे मिलींद नाईक, अकरावे निलेश काब्राल तर सर्वात शेवटच्या स्थानावर म्हणजे 12 व्या स्थानावर दीपक प्रभू पाऊसकर आहेत.

विरोधी पक्षनेता ठरेना

विरोधी काँग्रेस पक्षात चार माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अनुभवी आमदार असतानाही पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याचे आसन रिक्‍त राहिल्याचे दिसून आले.
राज्य विधानसभेच्या चाळीस आमदारांत काँग्रेसचे फक्‍त पाच आमदार उरले आहेत. यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, रवी नाईक, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, यांच्यासह कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा समावेश आहे. लॉरेन्स हेही राजकारणात अनुभवी असून विधानसभेत ते एकटेसुद्धा सत्ताधार्‍यांना धारेवर धरू शकतात, असे चित्र याआधी सगळ्यांनी पाहिले आहे. मात्र, या पाचही आमदारांमध्ये एकवाक्यता नसल्याने काँग्रेस पक्षाचा विधीमंडळ गटाचा नेता तसेच विरोधी पक्षनेता अजूनही ठरत नसल्याची चर्चा आहे. 

काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापसिंह राणे, रवी नाईक आणि लुईझिन फालेरो यांनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे या पदासाठी फक्‍त कामत आणि रेजिनाल्ड हे दोघेच आमदार बाकी उरले असले तरी त्यांच्यामध्ये एकमत होत नसल्याने पक्षाचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार हेही पेचात पडले आहेत. दिल्लीत सध्या हायकमांडच नसल्याने आणि अन्य कुणी निर्णय घेणारा नसल्याने अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला गेला नसल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी पाचही काँग्रेस आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली आहे. याविषयी माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांना विचारले असता ते म्हणाले की, अजून आमचा विरोधी पक्षनेता ठरलेला नाही. विरोधी पक्षनेता ठरविण्यासाठी एक-दोन दिवस उशीर झाला तरी काही फरक पडणार नाही.