Fri, May 29, 2020 23:16होमपेज › Goa › वेलिंगकर, उत्पल यांच्या उमेदवारीवर आज निर्णय

वेलिंगकर, उत्पल यांच्या उमेदवारीवर आज निर्णय

Published On: Apr 26 2019 1:49AM | Last Updated: Apr 27 2019 1:58AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात  तसेच ‘आप’चे वाल्मिकी नाईक  आज शुक्रवारी  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, ‘गोसुमं’तर्फे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या तसेच  भाजपतर्फे उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले. 

लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि  विधानसभेच्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष येत्या 19 मे रोजी होणार्‍या पणजी पोटनिवडणुकीकडे लागले आहे. 

भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री तथा पणजीचे तत्कालीन आमदार स्व. मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ  पुत्र उत्पल पर्रीकर आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर ही दोन नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे मान्यतेसाठी पाठवली आहेत. या दोन संभाव्य उमेदवारांपैकी उत्पल पर्रीकर यांचेच नाव शुक्रवारी (आज)जाहीर होण्याची दाट शक्यता  असल्याचे   सूत्रांनी सांगितले. 

   दरम्यान, गोसुमंने पक्षाचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरवण्याचे निश्‍चित केले आहे.  वेलिंगकर यांनी 8 दिवसांपूर्वी आपण पणजीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र पक्षाच्या कार्यकारिणीकडे तीन इच्छुकांची नावे असल्याचे सांगून पक्ष घेईल,तो निर्णय आपण स्वीकारू,असेही त्यांनी म्हटले होते. गोवा सुरक्षा मंचतर्फेही आज शुक्रवारीच उमेदवारीवर अंतिम निर्णय घेतला जाणार असून वेलिंगकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पणजीतील पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने बाबूश मोन्सेरात यांना 18 एप्रिल रोजी पक्षात प्रवेश देऊन त्यांची  उमेदवारी जाहीर केली  होती. भाजप व अन्य राजकीय पक्ष लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकांच्या प्रचार धामधूमीत व्यग्र राहिल्याचा फायदा घेऊन मोन्सेरात यांनी पणजी आणि ताळगावात प्रचाराला आरंभ केला आहे. मोन्सेरात यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी मोजक्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून   प्रचाराची रूपरेषा ठरविली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आपल्या पणजीतील कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने मोन्सेरात यांचा उत्साह दुणावला आहे. मगोचे पणजी मतदारसंघात फारसे कार्य अथवा कार्यकर्ते नसले तरी हिंदूबहूल भागात मते मिळवण्याइतपत मगोची क्षमता आहे. 

आम आदमी पक्षाचे (आप)  वाल्मिकी नाईक (आज) शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती आपचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिली. पणजीवासीयांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे सांगून भाजप, काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेचे भुकेले असल्याची टीकाही त्यांनी  केली.

 गोम्स म्हणाले, ङ्गआपफ  हा   राजकारणातील पर्याय म्हणून समोर येत आहे.    मागील अनेक वर्षापासून पणजी शहर  समस्यांच्या गर्तेत असून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र  त्यांनी  पणजीच्या विकास  तसेच नियोजनाकडे  पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी टीका त्यांनी  केला.

 स्मार्ट सिटी  महामंडळ, पणजी मनपा , सार्वजनिक बांधकाम खाते तसेच गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने विविध कामे शहरात हाती घेण्याच्या नावाखाली  पणजीची वाट लावली. याचा फटका तेथील जनतेला बसत असल्याची टीकाही गोम्स यांनी  केली.
 

पणजी पोटनिवडणूकीतील उमेदवार वाल्मीकी नाईक,आपचे नेते प्रदीप पाडगावकर,सुनील सिंगणापूरकर, रोडनी आल्मेदा व सिध्दार्थ कारापूरकर यावेळी उपस्थित होते.

भाजप, काँग्रेसचे साटेलोटे : गोम्स

भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे सत्तेसाठी एकमेकांशी साटेलोटे आहे. काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने त्यांनी पणजी पोटनिवडणुकीसाठी बाबूश मोन्सेरात  या आयात उमेदवाराचे नाव पुढे केल्याची  टीका  एल्विस गोम्स यांनी  केली.