Mon, May 25, 2020 11:18होमपेज › Goa › 'डॉक्टर ते मुख्यमंत्री व्हाया सभापती'

'डॉक्टर ते मुख्यमंत्री व्हाया सभापती'

Published On: Mar 19 2019 10:30AM | Last Updated: Mar 19 2019 12:06PM

file photoपणजी : प्रतिनिधी 

गोवा राज्याचे चोवीसावे मुख्यमंत्री बनलेले डॉ. प्रमोद सावंत यांचा जीवनप्रवास डॉक्टर ते मुख्यमंत्री व्हाया सभापती असा रोमहर्षक आहे. अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर विराजमान झालेले सावंत यांचे कार्य राज्यात नव्हे तर देशातील युवकांना स्फूर्तीदायक ठरण्याची शक्यता आहे.

डॉ. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती असून देशातील सर्वांत तरुण सभापती म्हणून त्यांना याआधी मान्यता मिळाली आहे. ते साखळी मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करतात. साखळी मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांना १९९८ साली नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाला होता.

सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 झाला असून ते आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. कोल्हापूर येथील ‘गंगा शैक्षणिक संस्थेच्या’ आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरची पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. समाजकार्याची त्यांना लहानपणापासून आवड असून 'समाजकार्य' या विषयात त्यांनी मास्टर्स केले आहे. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पदही त्यांना लाभले होते. सावंत २२ मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नव्हते, मात्र आता त्यांना थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ते अत्यंत विश्वासातले होते. त्यांच्या आजारपणाच्या काळात सरकारचे प्रतिनिधित्व करताना शासकीय कार्यक्रमात पर्रिकर यांची त्यांनी कमी भासू दिली नव्हती.

सावंत यांचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे असून सध्या ते गोव्यात कोठंबी पाळी येथील गावात राहतात. पांडुरंग आणि पद्ममिनी सावंत हे त्यांचे आई वडीत आहेत. वडील पांडुरंग सावंत यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या डिचोली तालुक्यातील शांतादूर्गा शाळेत शिक्षिका असून भाजप महिला प्रदेशच्या त्या अध्यक्ष आहेत.