Mon, May 25, 2020 04:42होमपेज › Goa › मंत्री मिलिंद नाईकांकडून कार्यकर्त्यांकरवी दहशत 

मंत्री मिलिंद नाईकांकडून कार्यकर्त्यांकरवी दहशत 

Last Updated: Dec 23 2019 12:59AM
दाबोळी : प्रतिनिधी

नाफ्ता प्रकरण अंगाशी येऊ नये यासाठी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मंत्री मिलिंद नाईक आपल्या कार्यकर्त्यांचा वापर करून दहशत माजवत आहेत. आपल्या स्वार्थासाठी ते लोकांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला बालन (सुरज) चोडणकर, शंकर पोळजी, जयेश शेटगांवकर व इतर उपस्थित होते. आमोणकर म्हणाले की, सडा येथील त्या पिंपल प्रकरणी परस्परविरोधात तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी मंत्र्यांच्या तक्रारीची दखल घेऊन बालन चोडणकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला तर आमच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कोणाचीही परवानगी नको, हा मंत्र्यांचा दावा चुकीचा आहे. देस्तरो, बोगदा, जेटी व इतर ठिकाणी काही धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यासंबंधी काहीजणांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जाची अजून दखल घेण्यात आली नाही. आता मंत्र्यांनी इतरांच्या तक्रारी लक्षात घेऊन घ्याव्यात. त्यांनी सध्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. हे त्यांनी नाफ्ताचे जहाज धक्क्यावर लागले तेव्हा का नाही केले, असा सवाल त्यांनी केला.

सुरज चोडणकर म्हणाले की, त्या झाडाच्या फांद्या लागतात हे दाखवणारी कागदपत्रे दाखविली असती तर हे प्रकरणच घडले नसते. मंत्री नाईक मला गुंड म्हणतात, मी जी भांडणे केली ती स्वत:साठी नाही तर दुसर्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केली. झाडांचे रक्षण करणारा गुंड कसा होऊ शकतो, असा सवाल त्यांनी केला. यावेळी जयेश शेटगावकर व शंकर पोळजी यांनीही मंत्र्यांवर ताशेरे ओढले.