Tue, May 26, 2020 08:52होमपेज › Goa › खाणपट्ट्यात ‘बंद’शांततेत

खाणपट्ट्यात ‘बंद’शांततेत

Published On: Feb 27 2019 1:14AM | Last Updated: Feb 27 2019 1:14AM
 फोंडा ः प्रतिनिधी

गेले वर्षभर बंद असलेल्या खाणी पुन्हा पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य तसेच केंद्र सरकारकडून काहीच कृती होत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त खाण अवलंबितांनी मायनिंग पीपल्स फ्रंटच्या नेतृत्त्वाखाली खाण पट्ट्यात पुकारलेल्या बंदला शहरी भाग वगळता खाण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावर्डे,केपे,कुडचडे,सांगे,धारबांदोडा तसेच डिचोली,साखळी,वाळपई,होंडा,पिसुर्ले भागातील दुकानदारांनी आपापली दुकाने,आस्थापने तसेच व्यवसाय बंद ठेवून खाण अवलंबितांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बंदच्या काळात विविध भागातून उसगावात आलेल्या दुचाकी रॅलींचे सभेत रुपांतर झाले.  प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने किरकोळ घटना वगळता अनुचित घटना घडली नाही.   बसेस तसेच  दूध व्यवसाय, फार्मसी आदी व्यवहार मात्र सुरळीत चालू होते. दरम्यान, खाण भागात पूर्णपणे बंद असला तरी शहरी भागात मात्र प्रतिसाद लाभला नाही. 

उत्तर व दक्षिण गोव्यातून खाण अवलंबितांची निषेध फेरी सकाळी काढण्यात आली. सावर्डे, कुडचडे, धारबांदोडा येथून आलेली वाहनांची निषेध फेरी तसेच अस्नोडा, डिचोली, साखळी, होंडा येथून आलेली निषेध फेरी तिस्क - उसगाव येथे एकत्रित झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. काँग्रेसचे आमदार तसेच गोवा सुरक्षा मंच, शिवसेना व इतर संघटनांचे प्रतिनिधींनी तिस्क - उसगाव येथे उपस्थिती लावली. 
यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार म्हणाले, राज्यातील बंद खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रात आणि गोव्यात असलेल्या भाजपच्या सरकारकडून आतापर्यंत केवळ आश्‍वासनेच देण्यात आली आहेत. खाणी बंद झाल्यामुळे लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला असून भाजप सरकारने खाण अवलंबितांना आश्‍वासनांवर झुलवत ठेवले. लोकांच्या भावनांशी खेळणार्‍या भाजपच्या नेत्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असून केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास पहिल्याप्रथम गोव्यातील खाणी सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

प्रतापसिंह राणे यांनी सांगितले,की खाणी बंद झाल्यामुळे लोकांची रोजीरोटी बंद झाली असून त्यावर सरकारने त्वरित तोडगा काढणे आवश्यक होते. मात्र लोकांना फसवी आश्‍वासने सरकारने दिली असून एकप्रकारे लोकांचा हा घात आहे. राज्यातील खाण व्यवसाय हा फार पूर्वीपासून सुरू असून त्यावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. या कुटुंबाना दिलासा देण्यासाठी खाणी पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले. 

दिगंबर कामत म्हणाले, खाणी सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत काहीच केलेले नाही. भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनांवरच खाण अवलंबित अवलंबून राहिले. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. 
प्राचार्य सुभाष वेलिंगकर म्हणाले, खाणी पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या खासदार आणि अन्य नेत्यांनी खाण अवलंबितांची थट्टा केली असून त्यांना योग्य धडा खाण अवलंबितांनी शिकवावा. 

शिवसेनेचे जीतेश कामत, राखी नाईक, काँग्रेसच्या स्वाती केरकर तसेच माजी आमदार प्रताप गावस, धर्मेश सगलानी, गोवा खाण मंचचे पुती गावकर व इतरांनी आपले विचार व्यक्त करून सरकारविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार केला.  

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

खाण भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. तिस्क - उसगाव येथे सर्वांत जास्त पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना आवश्यक सूचनाही करण्यात आल्या होत्या, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. 

सरकार धास्तावले....!

गोव्यात खाण भागातील बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याने गोव्यातील भाजपचे सरकार धास्तावले आहे. खाण अवलंबितांच्या शक्तीप्रदर्शनाने भाजपचे खासदार, मंत्री आणि आमदार धास्तावले असून खाण अवलंबितांचा रोष कायम राहिल्यास आणि खाणीसंबंधी नजीकच्या काळात योग्य तोडगा न निघाल्यास भाजपच्या मतांवर परिणाम होईल, असे भाजपचे पदाधिकारी खाजगीत बोलताना दिसले. 

शिस्तीत निघाली निषेध फेरी!

उत्तर व दक्षिण गोव्यातून खाण अवलंबितांची निषेध फेरी शिस्तीत निघाली. यावेळी दुचाकीवर काळे बावटे घेऊन खाण अवलंबितांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. उत्तर गोव्यातून अस्नोडा, डिचोली, साखळी, होंडा, पाळी, उसगाव या भागातून निषेध फेरी निघाली तर दक्षिण गोव्यातून सावर्डे, कुडचडे, धारबांदोडा येथून शिस्तीत निषेध फेरी काढण्यात आली.

काँग्रेसच खाणी सुरू करेल...!

राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असूनही भारतीय जनता पक्षाने खाण अवलंबितांच्या तोंडाला केवळ पाने पुसली. दोन्ही ठिकाणी सत्ता असूनही भाजपला गोव्यातील खाण अवलंबितांचा प्रश्‍न सोडवता आला नाही. येत्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गोव्यातील खाणी सुरू करण्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार असून केवळ काँग्रेसच गोव्यातील खाणी सुरू करू शकेल, अशी ग्वाही काँग्रेसच्या नेत्यांनी दिली. 

काँग्रेस, गोवा सुरक्षा मंच, शिवसेना पुढे!

खाण अवलंबितांच्या आंदोलनाला आतापर्यंत काँग्रेस, गोवा सुरक्षा मंच व शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. निषेध फेरीतही या राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. सर्वांनी भाजपवर तोंडसुख घेताना येत्या निवडणुकीत भाजपला नाकारा, असा संदेशच दिला.