Mon, May 25, 2020 13:07होमपेज › Goa › गोवा : जुन्या ४ मंत्र्यांना डच्चू, नव्यांची मंत्रिपदी वर्णी

गोवा : जुन्या ४ मंत्र्यांना डच्चू, नव्यांची मंत्रिपदी वर्णी

Published On: Jul 13 2019 2:14PM | Last Updated: Jul 13 2019 4:03PM
पणजी : पुढारी ऑनलाईन

गोव्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. एकीकडे काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केलेले चंद्रकांत (बाबू) कवळेकर, जेनिफर मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज या आमदारांनी आज राजभवनवर मंत्रिपदाची शपथ घेतली. तर त्याआधी गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यांच्या जागी मंत्रिमंडळात भाजपात दाखल झालेल्या तीन आमदारांना स्थान देण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ आमदार काँग्रेसमधून फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपदाची लाॅटरी लागली आहे. 

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर आणि अपक्ष आमदार तथा महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला होता. या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिफारस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यपालांकडे केली होती. ही शिफारस स्वीकारण्यात आल्याची अधिसूचना आज गोवा प्रशासकीय कामकाज विभागाचे संयुक्त सचिव गौरीश कुर्टीकर यांनी जारी केली. 

दरम्यान, आज दुपारी ३ वाजता भाजपचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांच्यासह चंद्रकांत कवळेकर, जेनिफर मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज यांचा शपथविधी झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

काँग्रेसच्या दहा आमदारांच्या भाजपमधील प्रवेशनाट्यामागे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची भूमिका महत्त्वाची होती.