Wed, May 27, 2020 18:12



होमपेज › Goa › भाजप आमदार म्हणतात, राहुल साधा माणूस; देशाला त्यांची गरज

भाजप आमदार म्हणतात, राहुल साधा माणूस; देशाला त्यांची गरज

Published On: Jan 30 2019 2:17PM | Last Updated: Jan 30 2019 2:18PM




पणजी : पुढारी ऑनलाईन 

सध्या भारतीय राजकारणात गोव्यासारख्या सर्वात छोट्या राज्याला फार महत्व आले आहे. राफेल प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री आणि सध्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपचा आधार घेत संसदेत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता राहुल गांधी यांनी गोव्यात जाऊन पर्रीकरांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. त्यातच भाजपचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी राहुल गांधी यांची तोंडभरुन स्तुती केली आहे. 

भाजपच्या कोणत्याही नेत्याने आजपर्यंत राहुल गांधी यांची स्तुती केल्याचे ऐकिवात नाही. पण, गोव्यातील सध्याची हवा (राजकीय) अशी काही बदलली आहे की एका भाजप आमदाराने चक्क राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. गोव्याचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी ‘राहुल गांधी यांनी मनोहर पर्रीकर यांची विचारपूस करण्यासाठी विशेष भेट घेतली. त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या माणुसकीची प्रत्येक भारतीय आणि गोव्याचा नागरिक प्रशंसा करेल. अशा साध्या माणसाची भारताला आणि गोव्याला गरज आहे', असे लोबो यांनी म्हटले आहे.

ADy Speaker & BJP MLA: Rahul Gandhi came on a special visit to greet our ailing CM Manohar Parrikar. His simplicity, humility has to be admired by all Indians and Goans. He is a very simple person & leaders like him are required in Goa & India. (29.1) pic.twitter.com/7K04LU3i4v

— ANI (@ANI) January 29, 2019

गोव्यात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने इतर पक्षांचा टेकू घेत सरकार स्थापन केले. त्यासाठी खास पर्रीकरांना दिल्ली सोडून गोव्यात परतावे लागले होते. लोबो यांच्या या वक्तव्यामुळे आता गोव्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.