Tue, May 26, 2020 06:00होमपेज › Goa › पणजी : 'त्‍या' प्रवाशांचा अजून थांगपत्ता नाहीच!

पणजी : 'त्‍या' प्रवाशांचा अजून थांगपत्ता नाहीच!

Last Updated: Mar 30 2020 2:49PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल करण्यात आलेल्या दोघा ‘कोरोना’बाधित रुग्णासोबत आलेल्या सुमारे सातहून अधिक प्रवाशांची माहिती मिळवण्यात प्रशासनाला अडचण निर्माण होत आहे. या प्रवाशांनी अपुरे पत्ते दिल्याने त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. यासाठी या सोबतच्या प्रवाशांनी स्वत:हून पुढे येऊन आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. 

गोमेकॉत सध्या दाखल असलेला एका बाधीत रुग्ण 9 मार्च रोजी दुबई ते बंगळूर व्हाया गोवामार्गे विमानाने राज्यात आला होता. सदर रुग्ण एअर इंडियाच्या-991 विमानातील सिट क्रमांक 25-अ वर बसला होता. तो गोव्यात उतरला असून त्याच्यासोबत असलेल्या काही प्रवाशांची माहिती व पत्ता मिळाले असले तरी सुमारे सात प्रवाशांचा अजूनही तपास लागलेला नाही. यातील तीन प्रवाशी उत्तर गोव्यातील एका गावातील असून बाकीच्या चार प्रवाशांनी चुकीचे वा खोटे पत्ते दिलेले असल्याचे उघड झाले आहे. या प्रवाशांचा पोलिस आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून शोध सुरू आहे. 

दुसर्‍या एका प्रकरणात,‘कोरोना पॉझीटीव्ह’ रुग्ण हा 22 मार्च 2020 रोजी न्युयार्क- मुंबईहून गोव्यात उतरला होता. तो मुंबईहून गोव्यात ‘विस्तारा डॉमेस्टीक फ्लाईट’ क्रमांक-युके-861 या विमानाने राज्यात आला होता. या प्रवाशांसोबत आलेल्यांनी तात्काळ शेजारील आरोग्य केंद्राकडे अथवा ‘मदत क्रमांक- 104’ वर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा यांनी 30 मार्च रोजी केले आहे.