Fri, May 29, 2020 22:25होमपेज › Goa › भाजपकडून सत्तेसाठी घोडेबाजार, घाणेरडे राजकारण

भाजपकडून सत्तेसाठी घोडेबाजार, घाणेरडे राजकारण

Published On: Apr 06 2019 1:45AM | Last Updated: Apr 06 2019 1:45AM
म्हापसा : प्रतिनिधी

रडीचे राजकारण करून राज्यात सत्ता  मिळवलेल्या भाजपने रात्रीचा खेळ चालवून सरकार चालवले. जनतेच्या मतांविरूध्द जाऊन, आमदार फोडून आपल्या पक्षात आणले हा मतदारांचा घोर अपमान आहे.   घोडेबाजार आणि सत्तेचा गैरवापर करून घाणेरडे राजकारण केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला   व सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपचा पराभव हा एकमेव अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, असेही यांनी सांगितले. त्यामुळे पोटनिवडणुकीतील तीनही जागा आणि लोकसभेच्या दोन्ही जागा  काँग्रेस प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

म्हापशातील हनुमान मंदिरात गार्‍हाणे घालून तसेच चर्चमध्ये प्रार्थना करून त्यांनी प्रचार सुरू केला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर गिरीश चोडणकर बोलत होते. यावेळी उमेदवार सुधीर कांदोळकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, डॉ.गुरूदास नाटेकर, रवींद्र फोगेरी, अ‍ॅड.सुभाष नार्वेकर, अमरनाथ पणजीकर, गटाध्यक्ष मिथाली गडेकर, आर्मिन ब्रागांझा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले की, मांद्रेतील इच्छूक कार्यकर्त्यांची नाराजी शमली असून बाबी बागकर यांच्या मागे समर्थपणे उभे राहण्यास अ‍ॅड. रमाकांत खलप, संगीता परब तयार आहेत.  काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून मतदारांचा घोर अपमान करणार्‍या दयानंद सोपटेंचा पराभव करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. म्हापशात तर सुधीर कांदोळकरांना सर्व ते सहकार्य करण्यास काँग्रेसची म्हापसा गट समिती व कार्यकर्ते कंबर कसून कार्य करीत आहेत. म्हणूनच सुधीर कांदोळकर प्रचंड मताधिक्क्याने निवडून येऊन इतिहास घडवणार आहेत. आणि बाबी बागकर ही फुटिरांना धडा शिकवणार आहेत. शिवाय लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभेच्या तिन्ही जागा जनता आमच्या पदरात घालणार आहे,असे ते शेवटी म्हणाले.

सुधीर कांदोळकर म्हणाले की, म्हापशातील स्वाभिमानी लोकांनी प्रोत्साहन दिल्याने आपण निवडणुकीत उतरलो आहोत. जनतेची इच्छा असल्याने विजय निश्‍चित आहे. निवडून आल्यावर म्हापसा शहराचा कायापालट करेन, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले की, राजकीय वातावरणात खूपच परिवर्तन झाले असून या निवडणुका प्रचंड मताधिक्क्याने जिंकण्याचे आव्हान कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे. निवडणुका झाल्यावर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. व सुधीर कांदोळकर यांना मंत्रिपद निश्‍चितच मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले की, या निवडणुकीत श्रीपाद नाईकांवर प्रचंड दबाव आला आहे. रवी नाईकांसारख्या दिग्गज उमेदवार आपला पराभव करू शकला नाही. गिरीश चोडणकर आपणासमोर काहीच नाहीत. हे वाक्य त्यांना भोवणार व शंभर टक्के गिरीश चोडणकरच यशस्वी होणार, असे ते शेवटी म्हणाले.