Mon, May 25, 2020 03:11होमपेज › Goa › हिरवागार, स्वच्छ गोवा हीच परीर्र्कर यांना श्रद्धांजली

हिरवागार, स्वच्छ गोवा हीच परीर्र्कर यांना श्रद्धांजली

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे हिरवागार आणि स्वच्छ गोवा हे  स्वप्न होते.त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारताना त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही.पर्रीकर यांचे स्वप्न साकार करून गोवा हिरवागार आणि स्वच्छ राखणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांची पहिली पुण्यतिथी मंगळवारी सरकारी पातळीवर पाळण्यात आली. मिरामार येथील पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळी यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्रीकर यांच्या तैलचित्राला पुष्पांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना पर्रीकर यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही.त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून घालून दिलेल्या मार्गावरुन आपली वाटचाल सुरु असून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून आपले काम सुरु आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की पर्रीकर यांनी राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. राज्याला स्वच्छ आणि नितळ बनवण्यासाठी साळगाव येथे साकारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प देशातला सर्वोत्तम कचरा प्रकल्प आहे.राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हटले जाते. पर्रीकर यांनी आपल्या कारकीर्दीत सुरु केलेली कामे 2022 मध्ये पूर्ण होणार असून ती गोव्यासाठी पुढील पंचवीस वर्षे उपयोगी पडणार आहेत.पर्रीकर यांच्या रूपाने दूरदृष्टी लाभलेल्या नेत्याला आम्ही मुकलो असलो तरी त्यांची स्वप्ने पूर्ण करून त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले असून राज्यातील सरकारी महाविद्यालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात दक्षिण गोव्याचे जिल्हा इस्पितळ काही कारणास्तव मागे पडले असले तरी सर्व इस्पितळे सर्व सोयींनी युक्त बनवण्यात आले आहे. राज्यात गोमेकॉसारखी अग्रणी आरोग्य संस्था असून त्यात कॅन्सर रुग्णांसाठी खास इस्पितळ आणि सुपर स्पेशलिटीचे काम लवकरच पूर्ण होत आहे. कृषी क्षेत्रातही प्रगती करण्यात आली असून देशात गोवा हे सर्वात प्रगत व एक क्रमांकाचे राज्य बनत असल्याचा दावा सावंत यांनी केला.     स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाच्या बांधकामाचे आदेश दिले गेले  असून काही विघ्नसंतोषी लोक या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सावंत यांनी केला. 

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, जलस्त्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीज, पणजीचे आमदार  बाबुश मोन्सेरात, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, पणजीचे महापौर श्री उदय मडकईकर, अ‍ॅड. जनरल  देवीदास पांगम, मुख्य सचिव परिमल राय, उत्तर जिल्हाधिकारी आर. मेनका, ईडीसीचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पोलिस महानिरिक्षक जसपाल सिंग,वित्त सचिव दौलत हवालदार, सरकारचे सचिव, इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि स्व. श्री मनोहर पर्रीकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मिरामार येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर भाजप मुख्यालयातील  कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे,सरचिटणीस दामू नाईक, संघटन मंत्री सतीश धोंड, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.