Mon, May 25, 2020 03:18होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

Published On: Aug 29 2018 12:49PM | Last Updated: Aug 29 2018 1:06PMपणजी : प्रतिनिधी

मुंबईमधील लीलावती इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (29 ऑगस्ट) रात्री पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले. मुख्यमंत्री अमेरिकेस जात असल्याची कल्पना मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, पर्रीकर यांचे स्वीय सचिव  रूपेश कामत यांनी  बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयातून  संदेश पाठवला, की पर्रीकर अधिक उपचारासाठी  अमेरिकेला जाणार असून ते पुढील आठवड्यात परत येण्याची अपेक्षा आहे, असे कळवले आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पचनसंस्थेत गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात समस्या  उद्भवली आहे. मुंबईत त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना अमेरिकेला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय लीलावती इस्पितळ आणि अमेरिकेच्या इस्पितळाकडून संयुक्‍तरीत्या घेण्यात आला असून पर्रीकर यांच्या कुटुंबीयांनाही यासंदर्भात विश्‍वासात घेण्यात आले आहे, अशी माहिती लीलावती इस्पितळाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर हे तीन महिन्यांपूर्वी स्वादूपिंडाच्या विकारावरील उपचारासाठी  अमेरिकेला गेले होते. त्यानंतर,  मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचार घेऊन पुन्हा अमेरिकेत उपचार घेऊन 22 जुलैला गोव्यात परतले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा उपचारांसाठी दुसर्‍यांदा अमेरिकेला गेले  होते,ते 22 ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी विश्रांती घेतली नाही.  दाबोळी विमानतळावर 22 ऑगस्ट रोजी दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन सुमारे अर्धा किलोमीटर चालत गेले. दुसर्‍या दिवशी त्यांना उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन ते बुधवारी ते 29 ऑगस्ट रोजी गोव्यात परतणार होते. मात्र, प्रकृती स्वास्थ्याबाबत पुन्हा समस्या उद्भवल्याने गोव्यात परतण्याऐवजी अधिक उपचारांसाठी तातडीने त्यांना अमेरिकेत जावे लागले.

आता  तिसर्‍यांदा ते 29 ऑगस्ट रोजी अमेरिकेत न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर’ स्मृती रुग्णालयात  उपचार घेण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर  कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले आहेत. 

दरम्यान, मुंबई  व अमेरिकेत उपचार घेऊन गोव्यात परतल्यावर जुलैमध्ये राज्य विधानसभा अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता.त्यांच्या स्वतःकडे असलेल्या खात्यांसह   अन्य आजारी मंत्र्यांच्या खात्यासंबंधी विषय त्यांनी अधिवेशनात हाताळले होते. या महिन्याच्या प्रारंभी 7 ऑगस्ट रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्य सरकारच्या खाण क्षेत्रातील सध्याच्या संकटावर लक्ष देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांना केली होती.

पर्रीकर यांना अपचनाचा त्रास : कुंकळ्येकर

गोव्यातील भाजपचे प्रवक्‍त तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले,  की मुख्यमंत्र्यांना अपचनाचा त्रास होत आहे. सध्या त्रास कमी झाला आहे. तरी त्याबाबत अधिक उपचार घेण्यासाठी ते अमेरिकेला जात आहेत. तेथील डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते लवकरच परत येतील. 

अधिकारी सक्षम :  मंत्री सुदिन ढवळीकर 

मुख्यमंत्री पर्रीकर याआधीही अमेरिकेला गेले होते,त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार  सुरळीत सुरू होता. हा कारभार आताही व्यवस्थित चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पर्रीकर यांनी आताही आपल्या अमेरिकेच्या दौर्‍याबाबत सर्व मंत्रिमंडळाला कळविले आहे. मात्र पर्रीकर केवळ आठवडाभरासाठी जाणार असतील तर पर्यायी व्यवस्था  करण्याची आवश्यकता नाही. 

इतरांकडे पदभार देण्याची गरज नाही : सभापती 

मुख्यमंत्री पर्रीकरांच्या उपचारामधील गुंतागुत कमी झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नाही. आणखी चांगल्या उपचारांसाठी पर्रीकर  अमेरिकेला रवाना झाले आहेत. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत कोणाकडेही त्यांचा पदभार सोपवण्याची आवश्यकता नसून, पर्रीकर लवकरच परत येऊन आपला पदभार स्वीकारतील, असेही सावंत म्हणाले.