Wed, May 27, 2020 04:37होमपेज › Goa › लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजयुमो’ने सज्ज रहावे

लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजयुमो’ने सज्ज रहावे

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 11:51PMपणजी : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पाहिले जात आहे. पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी युवा मोर्चा सदस्यांवर आहे. युवकांचा देश म्हणून भारताची ओळख असल्याने प्रत्येक क्षेत्रात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप युवा मोर्चाने सज्ज रहावे, असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. 

पणजीतील जीसीसीआय सभागृहात आयोजित भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आमदार दामू नाईक, शर्मद रायतूरकर, सदानंद तनावडे, प्रमय माईणकर उपस्थित होते. 

नाईक म्हणाले, की  देशात भाजपच्या सदस्यांची संख्या सुमारे  11 कोटी असल्याने भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पाहिले जात आहे. युवा कार्यकर्त्यांच्याच बळावर पक्ष जिंकत असल्याने युवा मोर्चांच्या सदस्यांनी धडाडीने काम करायला हवे. मोर्चाच्या सदस्यांना दिलेल्या जबाबदार्‍या पूर्ण करून पक्षाचे संघटन मजबूत करणे आवश्यक आहे. विरोधक विरोध करत राहणार कारण जनतेने ज्यावेळी त्यांच्या हाती सत्ता दिली, तेव्हा विकासकामे करणे त्यांना जमले नाही.

प्रमय माईणकर म्हणाले, की राजकारण म्हणजे वाईट अशी युवकांच्या डोक्यात असणारी कल्पना आपल्याला बदलायची आहे. विकासकामे करून आपल्याला अधिकाधिक युवकांना पक्षाशी जोडायचे आहे. 

बैठकीत वीस वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेली पहिली भारतीय महिला हिमा दास हिचे अभिनंदन करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.  माईणकर यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रभागाप्रमाणे वाटलेल्या जबाबदार्‍या वाचून दाखवल्या व पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.