Mon, May 25, 2020 10:52होमपेज › Goa › राज्य विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव आल्यास फेटाळावा

राज्य विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव आल्यास फेटाळावा

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

गोवा विधानसभा  विसर्जित   करून लोकसभा निवडणुकीबरोबर राज्य   विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्यात,असा  प्रयत्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर करणार असल्याची   भीती व्यक्‍त करून विधानसभा विसर्जनाचा  प्रस्ताव आल्यास तो फेटाळावा,  अशी  मागणी करणारे पत्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांना   प्रदेश काँग्रेसतर्फे सादर केल्याची माहिती  प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा विसर्जनाला काँग्रेसचा विरोध आहे. गोव्यात निवडणुका होऊन केवळ 18 महिने  झाल्यानेे पुन्हा जनतेवर निवडणूक लादू नये, अशी मागणीही राज्यपालांकडे  केल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले, गोव्यात  सध्या राजकीय अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासह  काही मंत्री आजारी आहेत. त्यामुळे  सध्या राज्यात आणिबाणीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सध्या आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केल्याने  त्यांनी देखील  मंत्रालयात जाऊन कामकाजाचा ताबा स्वीकारलेला नाही,अशा स्थितीतही त्यांनी पर्यायी नेतृत्वाचा निर्णय घेतला नाही.                      
ज्या प्रकारे  2002 साली  मुख्यमंत्रिपदी असताना पर्रीकर यांनी   मंत्र्यांना विश्‍वासात न घेताच   विधानसभा विसर्जित केली होती, त्याच पध्दतीने  ते आता म्हणजे 2018 मध्ये देखील करतील,अशी शक्यता पत्रात व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यमान भाजप सरकार  एकप्रकारे अल्पमतात असून परिस्थिती हाताबाहेर जात आहेत. सरकारवरील जनतेचा विश्‍वास  ढासळत आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर विधानसभा विसर्जित करुन लोकसभा निवडणूकीबरोबर राज्यात ही एकत्रितपणे निवडणूका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करुन  निवडणूका  पार पडे पर्यंत   काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची भीती आहेत.  त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी तसा प्रस्ताव पाठवल्यास त्याला मंजुरी देवू नये अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

काँग्रेसकडून भाजपने बळजबरीने    जनतेचा कौल  हिसकावून घेतला. त्यामुळे राज्यपाल सिन्हा यांनी   काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यावे.  काँग्रेस बहुमत सिध्द करेल, असा विश्‍वासही चोडणकर यांनी  व्यक्‍त केला. 

फार्मेलिनप्रश्‍नी चतुर्थीनंतर आंदोलन

फार्मेलिनप्रश्‍नी  सरकार गंभीर नाही.  त्यामुळे याविरोधात गणेश चतुर्थीनंतर काँग्रेसतर्फे  आंदोलन छेडले जाईल, या अंतर्गत   विविध मतदारसंघांमध्ये  उपोषण केले जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. राज्यातील मासळी बाजारात फार्मेलिनमुक्‍त मासळी उपलब्ध नाही. सरकारकडून बेकायदेशीर मासळी व्यवसायाला  अभय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सहकार चळवळीवर घाला   

 सरकारकडून सहकार  चळवळीला प्रोत्साहन देण्याऐवजी  ती संपवली जात असल्याचा आरोप  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन, गोवा राज्य सहकारी बँक  या बँकांची वाट लागली आहे.  ज्या बँकांवर विरोधी पक्षाच्या व्यक्‍ती आहेत  त्या बँका संपवण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.