Fri, May 29, 2020 23:06होमपेज › Goa › सरकारलाच दगा देतोय मगो पक्ष : मंत्री गोविंद गावडे 

सरकारलाच दगा देतोय मगो पक्ष : मंत्री गावडे 

Published On: Mar 26 2019 3:25PM | Last Updated: Mar 26 2019 3:27PM

गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडेपणजी : प्रतिनिधी 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने  शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.  मगो पक्ष गेल्या दोन वर्षांपासून सत्ता उपभोगून आता स्वतःचा फायदा पाहून निवडणुकीत उतरत आहे. मगो पक्ष सरकारचे खाऊन सरकारलाच दगा देत आहे. मंत्री सुदिन ढवळीकर या राजकीय घडामोडीत विदूषकाची भूमिका बजावत आहेत, अशी टीका कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे. 

पणजीत कला अकादमी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गावडे बोलत होते. 

मंत्री गावडे म्हणाले, की राज्यात भाजपचे सरकार असून मगोप हा घटक पक्ष आहे.  शिरोड्यात भाजप उमेदवारा विरोधात निवडणूक रिंगणात उतरून मगोचे अध्यक्ष भाजप विरोधी कारवाया करीत आहेत. याला मगोचे नेतृत्त्व जबाबदार आहे. सरकारच्या स्थिरतेला धोका पोहचविण्याचा मगो पक्षाचा हा प्रयत्न आहे.

आपला भाजपच्या उमेदवारालाच संपूर्ण पाठिंबा असेल. भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून आपण महादेव नाईक यांच्या बाजूनेच प्रचार करणार आहे. शिरोड्यात प्रचारासाठी जाणार तेव्हा मगोचा हा डाव लोकांपर्यंत पोचविणार, असेही गावडे यांनी म्हटले आहे.

शिरोड्यातून मगोला पोटनिवडणूक लढवायची असल्यास त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे व त्यानंतर पुढील रणनिती ठरवावी. युतीत राहून सरकारविरोधी अस्त्र बाळगणे चुकीचे आहे. अनेक वर्षे मगो पक्ष सत्तेत आहे. मगोची भूमिका कोणत्याच युती धर्मात बसत नाही. मगोपचे दोन आमदार फुटल्यास त्यांच्या पक्षाचे  अस्तित्वच राहणार नाही. तिथेच मगोचा शेवट होईल, असे वक्तव्य गावडे यांनी केले.