Thu, May 28, 2020 07:21होमपेज › Goa › राज्यात पावसाचा इंचांचा विक्रम

राज्यात पावसाचा इंचांचा विक्रम

Published On: Sep 21 2019 1:30AM | Last Updated: Sep 21 2019 1:30AM
पणजी : प्रतिनिधी

]राज्यात आतापर्यंत 151.20 इंच पावसाची नोंद झाली असून 2011 सालचा रेकॉर्ड मोडला आहे. 2011 साली संपूर्ण पावसाळ्यात 150 इंच पावसाची नोंद झाली होती, अशी माहिती गोवा वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. राज्यात आतापर्यंत 3840.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ सरासरीपेक्षा यावर्षी 33 टक्के जादा पाऊस पडला असल्याचेही वेधशाळेने नमूद केले आहे.

यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने पाऊस सरासरीच राहील असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यापासून पावसाने धरलेला जोर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होता. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 

राज्यात साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस इंचाची शंभरी गाठतो. परंतु यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यासच पावसाने शंभरी गाठली. गोव्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वाळपईत पडला आहे. वाळपईत 5 हजार 126.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. साखळीत 4 हजार 485.4 मि.मी., पेडणेत 4 हजार 372.8 मि.मी., पणजीत 3 हजार 547.9 मि.मी., 
एला जुने गोवेत 3 हजार 959.8 मि.मी., म्हापसात 3 हजार 276.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काणकोणात 3 हजार 420.4 मि.मी., दाबोळीत 3746.8 मि.मी., मडगावात 3 हजार 608.9 मि.मी., मुरगावात 3 हजार 129.7 मि.मी., केपेत 3 हजार 859.2 मि.मी. व सांगेत 4 हजार 385.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.