Tue, May 26, 2020 09:23होमपेज › Goa › मांडवीतून कॅसिनो हटवण्याला प्राधान्य

मांडवीतून कॅसिनो हटवण्याला प्राधान्य

Published On: May 14 2019 2:02AM | Last Updated: May 14 2019 12:10AM
पणजी : प्रतिनिधी

आम आदमी पक्षाने सोमवारी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात मांडवीतून कॅसिनो जहाजे हटवण्याला प्राधान्य दिले आहे. तसेच दर सहा महिन्यांत विविध प्रभागांमध्ये सामान्य जनतेसोबत बैठका घेऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या जातील व त्यावर तोडगा काढला जाईल, ‘आप’ विकासाची दूरद‍ृष्टी ठेवून प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करणार, अशा मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश असल्याचे ‘आप’चे पणजीतील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नाईक म्हणाले, ‘आप’ने जाहीरनाम्यात पणजीतील समस्यांसोबत तोडगाही दिलेला आहे. पणजी हे आजारी शहर बनले असून येथील पर्यावरण, रोजगार संधी, संस्कृती आणि प्रशासनाची स्थिती तर बिकटच झाली आहे. पणजीत पर्यावरणाचा र्‍हास होत असून पणजी कॅसिनोच्या हाती गेली आहे. पणजीला कॅसिनोपासून मुक्‍त करायची वेळ आहे. कॅसिनोवर आधारून राहण्यापेक्षा कौटुंबिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनाकडे वळणे गरजेचे आहे.

राजकीय पक्ष दर निवडणुकीत जाहीरनाम्यात त्याच-त्याच मुद्द्यांचा समावेश करत असून सत्तेवर आल्यानंतर आश्‍वासने मात्र पुरी केली जात नाहीत,     से सांगून ते म्हणाले की, आपकडून दर सहा महिन्यांत मतदारांसोबत बैठका घेतल्या जाणार असून लोकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल. यामुळे लोकांचे एकमेकांना दोष देणे बंद होईल, चर्चा करुन तोडगा काढला जाईल. कारण सहा महिन्यांनंतर पुन्हा संबंधित अधिकार्‍यांना लोकांना सामोरे जावे लागेल. 

राजकारण्यांकडून मतदारांच्या समस्या केवळ निवडणुकांवेळीच ऐकल्या जातात. सत्ता मिळाल्यानंतर या आश्‍वासनांचे काही होत नाही. सध्या केवळ राजकीय शत्रुत्व सुरू आहे. राज्यात सध्या केवळ राजकारण सुरू असून जनतेच्या समस्या जैसे थे आहेत, असेही ते म्हणाले. 

मतदारांना आज गुन्हेगारी पार्श्‍वभूमी व कोणताच डाग नसलेले आमदार हवे आहेत. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांची स्वच्छ प्रतिमा असली तरी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्‍वभूमी आहे. आप एक वेगळा विचार घेऊन निवडणुकीत उतरला आहे, असेही नाईक यांनी सांगितले. 

भाजप, काँग्रेस उमेदवार आयातीत मग्‍न : गोम्स
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास भाजप आणि काँग्रेस दोन्ही अपयशी ठरले आहेत. दोन्ही पक्ष केवळ स्वयंकेंद्रीत असून युवकांचे भविष्य त्यांनी अंधारात टाकले आहे. काँग्रेस आणि भाजप केवळ एकमेकांचे उमेदवार आयात करण्यात गुंतले आहेत, अशी टीका ‘आप’चे नेते एल्विस गोम्स यांनी केली.