Mon, May 25, 2020 04:38होमपेज › Goa › गोवा : रोहन खंवटेंच्या अटकेचा निषेध;विरोधकांकडून राज्‍यपालांना निवेदन

गोवा : रोहन खंवटेंच्या अटकेचा निषेध;विरोधकांकडून राज्‍यपालांना निवेदन

Last Updated: Feb 07 2020 4:02PM

रोहन खंवटे यांच्‍या अटकेचा विरोधकांकडून निषेध; राज्‍यपालांना दिले निवेदन पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने प्रथमच विरोधकांना विशेषतः चौघा माजी मुख्यमंत्र्याना सभागृहातून बाहेर काढले असून ही ऐतिहासिक घटना आहे. या कृतीबद्दल विरोधी गटाच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांना निवेदन सादर केले असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे लोकशाहीच्या नियमांचे पालन करत नाहीत. भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार बुधवारच्या मध्यरात्री विधानसभेचे आमदार रोहन खंवटे यांच्या निवास्थानी पोलिसांना पाठवून त्यांना अटक करणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. लोकशाहीच्या राज्यात असे कदापिही घडू शकत नाही.

विरोधी गटाच्या आमदारांनी रोहन खंवटे यांच्या अटकेचा निषेध केला असून त्याबद्दल सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र सभापती कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नाहीत. त्यामुळे विरोधी गटांच्या आमदारांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून सुरू असलेल्या अलोकशाहीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली असल्याचे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले.

गोव्यात पन्नास वर्षांच्या राजकीय इतिहासात सत्ताधार्‍यांकडून असे प्रकार कधीच घडलेले नाहीत. खरं म्हणजे सरकार सत्तेचा वापर करून लोकशाहीचा खून करीत असल्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

भाजपच्या समर्थकांनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्याविरूद्ध खोटी तक्रार पोलिसांत नोंदवलेली असून पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली खंवटे यांना बुधवारच्या मध्यरात्री त्यांच्या निवास्थानी जाऊन अटक केली.  खोट्या तक्रारीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण सभापतींकडे केल्याचे त्यांनी सांगितले.