Mon, May 25, 2020 12:13होमपेज › Goa › एस्मा दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीकडे

एस्मा दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीकडे

Last Updated: Feb 06 2020 1:49AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा  

गोवा अत्यावश्यक सेवा (एस्मा) दुरुस्ती विधेयक 2020 बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले. मात्र त्यातील दुरुस्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर हे दुरुस्ती विधेयक सभागृहात मंजूर न करता त्या विषयावर चर्चा व्हावी यासाठी चिकित्सा समितीकडे पाठविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

एस्माचा भंग करणार्‍यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा व जामीनपात्र गुन्हा नोंद करण्यासंबंधी तरतूद आहे. मात्र नवीन दुरुस्तीनुसार शिक्षेत वाढ करून ती तीन वर्षे करण्याचा निर्णय घेतला असून दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा नोंद करण्याचे ठरविले आहे. विधानसभेत एस्मातील सदर बदलांना विरोध करून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, की या बदलांमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. जनसामान्य तसेच कामगारांत विधेयकातील बदलांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होईल, असे सांगून त्यांनी विरोध नोंदविला.

आमदार रोहन खंवटे म्हणाले, की कायद्यात बदल करण्यासाठी काही कारण असायला हवे.  कायद्यांमध्ये आपल्याला हव्य तशा दुरूस्त्या करू शकत नाही. सरकार ज्या कायद्यांमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे, त्यात बदल करीत नसून आवश्यक नसलेल्या ठिकाणी दुरूस्ती विधेयक मांडले जात आहे. विधानसभेत एस्मा विधेयकात दुरूस्ती आवश्यक का आहे, यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठोस स्पष्टीकरण देता आले नाही. त्यांनी  विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.