Mon, May 25, 2020 14:20होमपेज › Goa › दवर्लीच्या युवकाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

दवर्लीच्या युवकाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

Last Updated: Feb 06 2020 1:49AM
मडगाव ः पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेतील टेक्सासमधील ह्यूस्टन येथे स्टोअर इन्चार्ज म्हणून काम करणार्‍या मूळ दवर्ली येथील फ्रेडी कुलासो या 32वर्षीय युवकाचा रविवारी एल्डीन बेंडर येथे भीषण कार अपघातात मृत्यू झाला. गेल्या चार वर्षांपासून फ्रेडी ह्यूस्टन येथे कामाला होता.

टेक्सासच्या वेळेनुसार रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची माहिती मंगळवारी ह्यूस्टन पोलिसांकडून फ्रेडीच्या दवर्ली येथील कुटुंबीयांना देण्यात आली. फ्रेडी हा त्याच्या  आईचा एकमेव आधार होता.काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या पश्‍चात  आई मारिया कुलासो व बहीण जोयसी असा परिवार आहे. फ्रेडीच्या निधनाची माहिती कळताच त्याच्या परिचितांनी तसेच परिसरातील लोकांनी   त्याच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले.

फ्रेडी आपल्या कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ह्यूस्टन येथील 400 एल्डीन बेंडर रोड येथे हा अपघात घडला. फ्रेडी हा काळ्या रंगाची किया ओप्टीमा ही कार घेऊन भरधाव वेगाने स्पेन्स रोडवरून प्रवास करत होता. यावेळी अचानक कार थांबविण्याचा सिग्नल पडल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची कार रस्त्यालगत असलेल्या काँक्रीटच्या कठड्यावर जाऊन आपटली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कार चक्काचूर झाली आणि फ्रेडी याचा जागीच मृत्यू झाला.

फ्रेडीची बहीण जोयसी यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, की  त्याचे पार्थिव गोव्यात पाठविण्याची प्रकिया सुरू झाली आहे. मात्र, सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह गोव्यात पोहोचण्यासाठी एक  महिन्याचा अवधी लागेल, असे तेथील प्रशासनाकडून  कळविण्यात आले आहे.