Tue, May 26, 2020 08:11होमपेज › Goa › मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावर; जावडेकर, सीतारामनना भेटणार

मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावर; जावडेकर, सीतारामनना भेटणार

Last Updated: Dec 19 2019 1:55AM
पणजी : प्रतिनिधी

आपण दिल्लीला जाणार असून दिल्ली दौर्‍यात रात्री उशिरा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन म्हादईसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. म्हादईबाबत गोव्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही केलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात असून लवकरच सकारात्मक उत्तर मिळणार आहे. आपली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशीही बुधवारी भेट नक्की झाली असून त्यांच्याशी राज्याशी निगडित काही विषयांवर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय, अन्य महत्त्वाच्या केंद्रीय मंत्र्यांशीही भेट घेण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पर्वरी येथे मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी प्रकाश जावडेकर यांच्याशी सोमवारी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना मंगळवारी सायंकाळी दिल्लीत भेटण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपल्याला 19 डिसेंबरच्या आधी म्हादई विषयावर समाधानकारक तोडगा हवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जावडेकर यांना सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले .

मुख्यमंत्री सावंत यांनी नाताळ आणि नववर्षानिमित्त पोलीस व वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांसोबत राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा मंगळवारी आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, आमदार जयेश साळगावकर, एलिना साल्ढाना, चर्चिल आलेमाव आदी सामील झाले होते.