Mon, May 25, 2020 04:46होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे वाटप होणार पितृपक्षानंतर  

खात्यांचे वाटप होणार पितृपक्षानंतर  

Published On: Oct 02 2018 1:16AM | Last Updated: Oct 02 2018 11:14AMपणजी : प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाची बैठक ‘एम्स’मध्ये घेणार असल्याचे तसेच आपल्याकडील काही खात्यांचे   मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांना पितृपक्ष संपल्यानंतर, म्हणजे येत्या 10 ऑक्टोबरनंतर वाटप करणार असल्याचे पर्रीकर यांनी आपल्याला सांगितल्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई  यांनी सांगितले.  दिल्लीत ‘एम्स’मध्ये उचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर एम्समध्ये स्वादूपिंडावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारलेली आहे. पर्रीकरांनी मंत्रिमंडळातील बाकी मंत्र्यांना अधिक अधिकार देण्याची आणि मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. पर्रीकर  यांनी सध्या सुरू असलेला पितृपक्ष   10 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत असल्याने त्यानंतरच आपण अन्य मंत्र्यांना खातेवाटप करणार असल्याचे आपल्याला सांगितले.

राज्यात आयात होणार्‍या मासळीमध्ये फार्मेलिन हे घातक रसायन लावलेले असल्याने गोमंतकीयांच्या जीवाला आणि आरोग्याला धोका असल्याचा प्रचार विरोधी काँग्रेसने राज्यभर केला आहे. काँग्रेसचा सदर दावा अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी फेटाळला आहे. मंत्री राणे यांनी लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न  केला असला तरी लोकांच्या मनातील भीती कमी झालेली नाही. याप्रकरणी लोकांचा सरकारवरील विश्‍वास कायम राखण्यासाठी पर्रीकर यांनीच ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे आपण पर्रीकर यांना सांगितल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

राज्याच्या प्रशासन व्यवस्थेविषयी लोकांच्या मनात शंका असून सोशल मीडियात त्यावर चर्चा वाढत आहे. प्रशासन म्हणजेच सरकारवरील विश्‍वास सध्या डळमळीत झाला असून तो वाढण्यासाठीही उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे आपण सांगितल्याचे सरदेसाई म्हणाले.