Wed, May 27, 2020 11:04होमपेज › Goa › एकदिवशीय अधिवेशन बोलावून भाजपने बहुमत सिद्ध करावे

एकदिवशीय अधिवेशन बोलावून भाजपने बहुमत सिद्ध करावे

Published On: Nov 18 2018 1:25AM | Last Updated: Nov 17 2018 11:11PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात प्रशासन पूर्ण कोलमडले असून लोकशाहीची एकप्रकारे थट्टा केली जात आहे. त्यामुळे  गोवा विधानसभेचे एकदिवशीय विशेष अधिवेशन बोलावून भाजपने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्‍ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली.

खाण बंदी, बेराजगारी, प्रादेशिक आराखडा, फॉर्मेलिन आदी महत्वाचे प्रश्‍न सोडवण्यास सरकारला अपयश आले आहे. भाजप सरकारकडून घालण्यात आलेल्या गोंधळाचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला बसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सुरजेवाला म्हणाले की, राज्यातील यंत्रणा कोलमडली आहे. जनतेने दिलेला कौल चोरुन भाजपने सत्ता स्थापन केली. परंतु जनतेला सुशासन देणे सरकारला 
जमलेले नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीदेखील  गोव्यात भाजपने बहुमत गमावल्याचे मान्य केले होते. मात्र, गोव्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी फेटाळून लावल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील एकूण राजकीय स्थितीविषयी जनतेच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून भाजप सरकारने आपले बहुमत सिध्द करुन दाखवावे. यामुळे जनतेच्या मनातील प्रश्‍नदेखील मिटतील, असे मत सुरजेवाला यांनी व्यक्‍त केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपतीमुळे राज्यातील प्रशासन ढेपाळले असल्याचे विधान उपसभापती मायकल लोबो यांनीदेखील केले होते. ‘मगो’देखील वारंवार नेतृत्व बदलाची मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी कुठलेही अधिकृत हेल्थ बुलेटीन जारी का करण्यात  येत नाही. मुख्यमंत्री ठीक आहेत तर त्यांना भेटण्यास विरोधी पक्षनेत्याला वेळ का दिला जात नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, निळकंठ हळर्णकर व अन्य नेते उपस्थित होते.