Mon, May 25, 2020 13:00होमपेज › Goa › विधानसभा कामकाज हेऊ देणार नाही

विधानसभा कामकाज हेऊ देणार नाही

Last Updated: Feb 06 2020 11:22PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा  

अर्थसंकल्प मांडताना ज्येष्ठ आमदारांना सभागृहाबाहेर बाहेर काढण्याचा  प्रकार प्रथमच घडला आहे. लोकशाहीतील हा काळा दिवस आहे. आमदारांना सभागृहातून बाहेर काढणे हा लोकशाहीचा खून आहे, अशी टीका करत, खवटे यांना अटक केली गेल्या प्रकरणी शुक्रवारी (आज) देखील निषेध सुरूच ठेवणार व सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा गुरूवारी विरोधकांनी विधानसभेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

विधानसभेत गुरूवारी  दुपारच्या सत्रातील कामकाजाच्या वेळी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभापती राजेश पाटणेकर यांनी विरोधकांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. सभागृहातून बाहेर आल्यानंतर आमदारांनी विरोधी पक्ष नेत्याच्या कक्षाच्या लॉबीत पत्रकार परिषदेत घेऊन सभापतींच्या वागण्याचा निषेध केला. अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्याविरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करणारे भाजपाचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना अटक व्हायला हवी, अशी मागणीही विरोधकांनी यावेळी केली. 

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, की सभापतींनी विरोधी पक्षांच्या आमदारांना चर्चेला बोलविले होते. त्यानुसार विरोधी आमदार त्यांना भेटले. तेव्हा थोडा वेळ चर्चा झल्यानंतर या विषयावर नंतर बोलूया, असे सभापतींनी सांगितले.

विरोधी पक्षातील आमदार सभागृहात उपस्थित नसताना त्यंचा गैरहजेरेत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला ,हे चुकीचे असल्याचे कामत यांनी सांगतले.  आपण मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन झाली. मात्र ,आपण एकाही व्यक्तीला अटक केली नाही. आपल्या कार्यक्रमात भाषा आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क असतो. आपण आंदोलकांना सामोरे गेलो,  मात्र कुणालाच अटक केली नाही, असेही कामत यांनी सांगितले. 

विजय सरदेसाई म्हणाले,की आमदार खंवटे हे गेले तीन दिवस सभागृहात सरकारच्या विरोधात बोलत होते, त्यामुळे खंवटे यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अटक करण्याचा प्रकार सरकारकडून करण्यात आला आहे. खंवटे यांच्यावर करण्यात आलेली तक्रार खोटी आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे कथित घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार निराश असून सभापतींनी केलेले कृत्य घटनेविराधी आहे. खंवटे यांना अटक करण्याची ‘आयडिया’ कुणाची होती, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी सरकारची तुलना पोर्तुगीज राजवटीशी केली. राणे म्हणाले, की पोर्तुगीज राजवटीत ‘जय हिंद’ च्या घोषणा करणार्‍यांना अटक केली जायची. सध्याचे सरकार पोर्तुगीज राजवटीप्रमाणे वागत आहे. खंवटे यांच्याविरोधात केलेली तक्रार खोटी असून आपण खंवटे यांच्यासोबत होतो आणि धमकावण्याचा प्रकार घडलेला नाही. सभातींनी आमदारांना सभागृहाबाहेर काढणे हे चुकीचे असून सभापतींनी आमदारांशी याविषयावर चर्चा करणे आवश्यक आहे, असेही राणे यांनी  सांगितले. 

रवी नाईक म्हणाले, की सभागृहात अर्थसंकल्प सादर करीत  असताना चार माजी मुख्यमंत्र्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले आहे, हे निंदनीय आहे. सभापतींनी निर्णय घेण्यापूर्वी विचार करायला 
हवा. अर्थसंकल्प सादर केला जात असताना, अपात्रता याचिका दाखल असलेल काही आमदार  सभागृहात बसले होते. मात्र, सभागृहातील ज्येष्ठ आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले . आपण मंत्रिमंडळात होतो तेव्हा कला आणि संस्कृती मंत्र्यानी मंत्रिमंडळ बैठकीत अपशब्द वापरले होते. यासंदर्भात, आपण सभापतींकडे तक्रार केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. गेल्या 50

वर्षात प्रथमच ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांना अर्थसंकल्पावेळी सभागृहाबाहेर पाठविण्यात आले आहे. तसेच रवी नाईक, लुईझिन फालेरो व अन्य जेष्ठ आमदारांनाही अर्थसंकल्पवेळी बाहेर काढण्यात आले आहे. 
- सुदिन ढवळीकर 
आमदार