Mon, May 25, 2020 11:36होमपेज › Goa › आयुषमंत्री नाईक यांची उमेदवारी दाखल

आयुषमंत्री नाईक यांची उमेदवारी दाखल

Published On: Mar 30 2019 1:36AM | Last Updated: Mar 31 2019 1:18AM
पणजी : प्रतिनिधी 

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी  शुक्रवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच यश मिळणार असून तीच स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर  दिली.

मंत्री जयेश साळगावकर, मंत्री विनोद पालयेकर, मंत्री मिलींद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, स्वर्गीय  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर  व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत केंद्रात एनडीएचे सरकार येणार.  गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर  भाजपला  100 टक्के यशाची खात्री आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप प्रथमच निवडणूक लढवत आहे. भाजपच्या दोन्ही जागा   निवडून द्याव्यात, तीच पर्रीकरांना खरी  श्रध्दांजली ठरेल. भाजपला गोवा फॉरवर्ड तसेच अपक्षांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी  सांगितले.

पंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मागील पाच वर्षांत तर राज्यातील भाजप सरकारने गोव्यात मागील दोन वर्षांत   मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. जनता सूज्ञ आहे. केंद्रीय आयुषमंत्री नाईक हे जनतेच्या नेहमीच संपर्कात असतात, असे सांगून खासदार निधीतून त्यांनी अनेक विकास प्रकल्प राबवल्याचेही त्यांनी  सांगितले. 

आयुषमंत्री श्रीपाद नाईक  म्हणाले,  निवडणुकीत विरोधी वातावरण नाही. प्रचारासाठी मतदारसंघांचा दौरा करताना त्याची कुठेही जाणीव झालेली नाही. मात्र त्याचबरोबर विरोधी उमेदवारांना आपण कधीही कमी लेखत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान 12 एप्रिलला गोव्यात
लोकसभेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 एप्रिल रोजी राज्यात येणार आहेत. त्यांची सभा पणजीत अथवा उत्तर गोव्यातच सकाळच्यावेळी आयोजित केली जाणार आहे. या सभेचे नेमके ठिकाण व वेळ नंतर जाहीर केली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.