Wed, May 27, 2020 18:06होमपेज › Goa › गोव्यात राजकीय भूकंप; दोन आमदार फुटल्याने ढवळीकरांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात 

गोव्यात राजकीय भूकंप; दोन आमदार फुटल्याने ढवळीकरांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात 

Published On: Mar 27 2019 8:07AM | Last Updated: Mar 27 2019 8:28AM
पणजी : पुढारी ऑनलाईन

गोव्यात मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांची नावे आहेत. त्यांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्रही गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो यांना सादर केले आहे. 

मगो पक्षाचे दोन आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १४ झाले आहे. दरम्यान, मगो पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी मात्र सभापतींना सादर केलेल्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. मगोच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मगो पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नुकतीच शपथ घेतलेले ढवळीकर यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे.  

बुधवारी पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी आजगावकर आणि पावस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मगो पक्षच विलीन करत असल्याचे पत्र सभापतींना सादर केले. यामुळे मगो पक्षाचे सुदीन ढवळीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे मगो पक्षाच्या दोन आमदारांनी गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

गोव्याची विधानसभा ४० आमदारांची आहे. सध्या भाजप आमदारांचे संख्याबळ १२ आहे. तर काँग्रेसचे १४ आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. भाजप सरकारला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ३, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या ३, अपक्ष ३ आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र, आता मगो पक्षाचे दोन आमदार फुटल्याने भाजपचे संख्याबळ १४ वर पोहचणार आहे.  

काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. तसेच म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिझोझा यांच्या निधनानंतर येथेही पोटनिवडणूक होणार आहे. तर नुकतेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे.