Mon, May 25, 2020 12:39होमपेज › Goa › कॅसिनो गेम्स गुंतवणूकदारांची 1 कोटीची फसवणूक

कॅसिनो गेम्स गुंतवणूकदारांची 1 कोटीची फसवणूक

Last Updated: Feb 08 2020 10:50PM
पणजी ः पुढारी वृत्तसेवा

गोव्यात कॅसिनो गेम्सच्या व्यवहारात गुंतवणूक करणार्‍यांना दरदिवशी 3 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 1 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या ड्रीम 2 रियलिटी कॅसिनोच्या ठकसेनांचा आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात ड्रिम 2 रियलिटी कॅसिनो कंपनीचे प्रमुख सूत्रधार दशरथ बोरा, कार्यालयीन प्रमुख आदिगणेश, फक्रुद्दिन (गोवा एजंट) व संदीप (आयटी एक्सपर्ट) या चार जणांना अटक केली आहे. या फसवणूक प्रकरणात श्‍वेता नामक एका स्थानिक महिलेचा सहभाग असून पोलिस तिच्या शोधात असल्याचे आर्थिक गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी ईस्माईल मुंशी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी ईस्माईल मुंशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने पणजीतील कदंब पठारावरील ड्रीम 2 रियलिटीच्या कार्यालयावर छापा मारला. कॅसिनोच्या चालकांनी गोव्यासह सात राज्यांतील मिळून सुमारे 400 जणांना एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांना आढळून आले. ही सर्व फसवणूक अवघ्या एका महिन्यात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रीम 2 रियलिटी कॅसिनोच्या चालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर गुंतवणुकीची जाहिरात करून गुंतवणुकीबाबत ऑनलाईन व्यवहार सुरू केला होता. या कॅसिनो कंपनीचे सदस्य बनलेल्या गुंतवणूकदारांकडून 10 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम आगाऊ घेतली होती. त्यांच्या गुंतवणुकीवर दर दिवशी 3 टक्के व्याज दिले जाणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, त्यांना गुंतवणूक रकमेच्या पावत्या दिल्या नव्हत्या. या गुंतवणूकदारांना आयफोन, गोवा फिरण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहने, हॉटेलात निवासाची सोय व विमानाची तिकिटे देण्याची आमिषे दाखविण्यात आली होती.

याशिवाय कंपनीला नवीन गुंतवणूकदार जोडून देणार्‍या गुंतवणूकदाराला आणखी सवलती देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात गोव्यासह 7 राज्यांतील गुंतवणूकदारांकडून ड्रीम 2 रियलिटी कॅसिनोच्या चालकांनी गंडा घातल्याचे आढळून आले आहे. आर्थिक गुन्हा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई व प्रवीणकुमार वस्त यांनी या प्रकरणाचा छडा लावला.