Wed, May 27, 2020 04:06होमपेज › Goa › सोपटे, शिरोडकरांनी स्वेच्छेने राजीनामे न दिल्याचे पुरावे द्या

सोपटे, शिरोडकरांनी स्वेच्छेने राजीनामे न दिल्याचे पुरावे द्या

Published On: Nov 27 2018 1:21AM | Last Updated: Nov 27 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले  माजी आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी स्वेच्छेने राजीनामे दिले नाहीत याचे पुरावे सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिकादार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला दिला आहे. पुरावे सादर केले जाईपर्यंत सोपटे व शिरोडकर यांना नोटिसा बजावण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवार (दि. 30) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोपटे व शिरोडकर यांच्या विरुद्ध मगो पक्षाने  मागील आठवड्यात न्यायालयात अपात्रता याचिका सादर केली होती.

या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकादारांतर्फे आवश्यक पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने सांगितले. दोन्ही आमदारांनी कोणत्या पार्श्वभूमीवर राजीनामे दिले याचे स्पष्टीकरण याचिकेत आहे, परंतु त्यांनी स्वेच्छेने राजीनामे दिले नाहीत, हे  सिद्ध करणारा एकही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. हे पुरावे सादर करण्यासाठी याचिकादाराला न्यायालयाकडून वेळ दिला जात असल्याचे न्यायालयाने सांगितले.

आमदार अपात्रतेबाबत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.  सभापती आमदारांना अपात्र ठरवेपर्यंत त्यात न्यायालय दखल देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार स्वेच्छेने आमदारकीचा राजीनामा दिल्यास त्या आमदाराला न्यायालय अपात्र ठरवू शकत नसल्याचे न्यायमूर्तींनी आदेशात नमूद  केले आहे. 

भाजप युती सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या मगोने काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या सोपटे व  शिरोडकर यांच्या  विरोधात याचिका दाखल केली होती. यामुळे भाजपकडून मगोवर टीकाही करण्यात आली होती.