Wed, Jul 08, 2020 13:49होमपेज › Goa › मडगाव, फातोर्डासाठी कचरा प्रकल्प

मडगाव, फातोर्डासाठी कचरा प्रकल्प

Last Updated: Oct 26 2019 2:01AM
पणजी : प्रतिनिधी

मडगाव, फातोर्डा व आजूबाजूच्या भागातील गोळा करण्यात येत असलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन ‘मिनी प्रकल्प’ उभारले जाणार आहेत. यातील दोन मिनी कचरा प्रकल्प मडगाव पालिकेच्या निधीतून, तर एक प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे बांधण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

पर्वरी  येथील  मंत्रालयात मंगळवारी सोनसडा संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर ते बोलत होते. 

या बैठकीत मंत्री मायकल लोबो, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना लोबो म्हणाले की, मडगाव, फातोर्डा व  आजूबाजूच्या परिसरात कचर्‍याची मोठी समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मडगाव परिसरात अनेक ‘ब्लॅक स्पॉट’ असून तिथे रात्रीच्यावेळी रिक्षा  वा पिकअपमधून कचरा टाकला जात आहे. बागा- कळंगूट भागातही काही वर्षांपूर्वी सुमारे 141 ‘ब्लॅक स्पॉट’ अस्तित्वात होते. साळगाव कचरा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्यानंतर सध्या उत्तर गोव्यातील 27 पंचायत क्षेत्रातील कचर्‍यावर तेथे प्रक्रिया केल्याने आज तेथील शहरी आणि ग्रामीण भागात उघड्यावर कचरा टाकणे बंद झाले आहे. 

शहरात वा गावात खुलेआम कचरा  टाकणे हा प्रकार निषिद्ध असून तो बंद होणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी यावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जर लोकांना विनंती करूनही समज येत नाही, तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे गरजेचे आहे.  महामंडळातर्फे मडगाव पालिकेला आणि स्थानिक पोलिसांना चलन पुस्तिका देण्यात येणार असून उघड्यावर कचरा टाकणार्‍यांकडून दंड वसूल केला जाणार आहे. हॉटेल सारख्या मोठ्या आस्थापनातून ओला वा सुका कचरा बाहेर टाकण्यात आला तर त्यांना तुरूंगवासही घडू शकतो, असा इशारा लोबो यांनी दिला. 

लोबो म्हणाले, की सोनसडा जागेवरील कचर्‍याचा डोंगर हा अनेक वर्षापासूनचा आहे. सोनसड्यावरच प्रत्येकी 500 चौरस मीटर जागेत दोन कचरा प्रकल्प उभारून त्यात सध्याच्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सुक्या कचर्‍यावरही प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा वापर केला जाणार आहे. 

फोमेंतोची थकबाकी सहा कोटीच ः मुख्यमंत्री 

सोनसडा प्रकल्पाची गेली अनेक वर्षे जबाबदारी पेलणार्‍या फोमेंतो कंपनीची थकबाकी 12 कोटी रुपये नसून ती सुमारे 5-6 कोटी एवढीच आहे. ही थकबाकी पूर्णपणे भरण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मडगाव व  शेजारील भागातील कचर्‍याची समस्या येत्या दोन महिन्यांत दूर होण्याची आशा आहे. यासाठी, आपण फोमेंतोचे अध्यक्ष अवधूत तिंबलो यांची भेट घेऊन मडगाव शहराच्या भल्यासाठी सदर सोनसडा कचरा प्रकल्प गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सुपुर्द करावा, अशी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर सांगितले.