Thu, May 28, 2020 06:36होमपेज › Goa › हटविलेल्या झोपड्यांच्या ठिकाणी गांजा जप्त

हटविलेल्या झोपड्यांच्या ठिकाणी गांजा जप्त

Published On: Jul 21 2019 1:23AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
पणजी ः प्रतिनिधी

कांपाल पणजी येथील परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर झोपड्यांच्या ठिकाणी पणजी मनपा व पणजी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. पणजी मनपा महापौर उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानावर असलेल्या पाण्याच्या मोठ्या पाईपमध्ये जवळपास 47 पाकीटे गांजा या कारवाईत जप्‍त करण्यात आला आहे. पणजी पोलिसांनी तो ताब्यात घेऊन पंचनाम्यासाठी पाठवला आहे.

कांपाल येथील परेड मैदानावर बेकायदेशीरपणे झोपड्या उभारुन राहणार्‍या फिरत्या विक्रेत्यांना यापूर्वीदेखील पणजी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करीत असल्याच्या माहितीवरून अटक केली होती. या ठिकाणी सुमारे सहा झोपड्या बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्या होत्या. यात राहणारे लोक हे फुगे तसेच अन्य साहित्य विकणारे फिरते विक्रेते आहेत. बहुतेकजण हे महाराष्ट्रातील असून काही जणांना पणजी पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रंगेहाथदेखील अटक केली होती.

महापौर मडकईकर म्हणाले, या ठिकाणी असलेल्या सहा बेकायदेशीर झोपड्या काही दिवसांपूर्वी मनपाने हटवल्या होत्या. मात्र, दुसर्‍याच दिवशी हटवण्यात आलेल्या सहा पैकी तीन झोपड्या या लोकांनी पुन्हा बेकायदेशीरपणे उभारल्या. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर पुन्हा कारवाई करुन या झोपड्या हटवण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. सदर परिसरात या लोकांकडून अमली पदार्थ विकला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. झोपड्या हटवण्याच्या कारवाईनंतर शनिवारी मनपा व पणजी पोलिसांनी संयुक्‍तपणे कारवाई केली असता या ठिकाणी असलेल्या मोठ्या पाईपमध्ये गांजाची सुमारे 47 पाकीटे आढळून आली आहेत. या गांजाची रक्‍कम नक्‍की किती आहे याचा तपास पोलिस घेत आहेत. अमली पदार्थांना पणजीत थारा दिला जाणार नसून कारवाई सुरुच ठेवली जाईल, असा इशाराही मडकईकर यांनी दिला.