Thu, Jul 02, 2020 14:13होमपेज › Goa › प्रियकराला जबर मारहाण करून प्रेयसीवर सामूहिक बलात्कार!

प्रियकराला जबर मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार!

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 11:33AMमडगाव : प्रतिनिधी

प्रेमीयुगुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेतालभाटी येथील सनसेट बीचवर फिरण्यासाठी आलेल्या प्रियकराला जबर मारहाण करून त्याच्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. या घटनेने सासष्टी तालुक्याला हादरवून सोडले असून कोलवा पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत त्या तिघा नराधमांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सदर युवती 20 वर्षीय असून तिचा मित्र 22 वर्षांचा आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हे युगुल बेतालभाटी समुद्र किनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी अन्य काही जोडपीसुद्धा होती. रात्री तेथे असणारी सर्व जोडपी माघारी परतली होती; पण हे एकमेव युगुल त्या ठिकाणी रात्री साडेनऊपर्यंत थांबले होते.

रात्री अंधाराचा फायदा घेत तिघेजण त्या ठिकाणी आले. समुद्र किनार्‍यावर अन्य कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी त्या युगुलाला  पकडले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यातील युवकाने आपल्याजवळ पैसे नसून जवळच पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीमध्ये दोनशे रुपये ठेवल्याचेत्यांना सांगितले. दोनशे रुपये नेण्यासाठी ते तिघे त्यांना घेऊन दुचाकीजवळ आले. पैसे देऊनसुद्धा त्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्या नराधमांनी युवतीकडे शरीरसुखाची मागणी केली, पण तिने नकार देताच तिच्या मित्राला या तिघांनी जबर मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती गावस यांनी दिली.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघा अज्ञात युवकांविरोधात भा. दं. सं. कलम  376 अंतर्गत कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कोलवा पोलिस स्थानकाचा अतिरिक्त ताबा असलेले पोलिस निरीक्षक नवलेश देसाई पुढील तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत संशयित युवकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.